पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेमध्ये महिलांचे मोलाचे योगदान
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या महिला ३२ प्रभागात ४५२ कार्यरत


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. यामध्ये महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदानही खूपच महत्त्वाचे असून शहरातील ३२ प्रभागात कायमस्वरूपी ४५२ महिला स्वच्छता कर्मचारी कार्यरत असतात.


जागतिक महिला दिन (८ मार्च) शनिवारी सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार आहे. जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी केलेल्या कामाचे कौतुक केले जाते. पिंपरी चिंचवड शहरामध्येही तब्बल ४५२ महिला स्वच्छता कर्मचारी शहर स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठी कार्यरत असून महिला दिनीही त्यांचे कौतुक करावे लागेल. कारण या महिलांमुळेच आपले शहर स्वच्छ राहतेच, शिवाय शहरातील स्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ राहावे, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात पहाटेपासून सुरु होणारे दैनंदिन साफसफाईचे काम याच स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने अव्याहतपणे सुरु आहे. या महिला कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील पुढाकार घेत आहे.
महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांची महानगरपालिकेकडून वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. याशिवाय प्रसूती रजा, बाल संगोपन रजा देण्यात येतात. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी सुरक्षा साधने उपलब्ध करुन देणे, इतर आवश्यक सोयीसुविधा देणे, यासाठीही महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करीत असते. शहराची स्वच्छता करण्यासाठी कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी भगिनींना महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा – शेखर सिंह,आयुक्त तथा प्रशासक










