जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आज आयोजन


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ८ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत महिलांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.


आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमास सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे. याव्यतिरिक्त खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप,शंकर मांडेकर, आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे यांची सन्माननीय उपस्थिती यावेळी असणार आहे. या मान्यवरांसह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली आहे.

सकाळी १० वाजता ह.भ.प नेहाताई भोसले साळेकर यांच्या किर्तनाने कार्यक्रमांची सुरूवात होणार आहे. त्यानंतर महिला दिनानिमित्त महिला बचत गटांचा सन्मान करण्यात येणार असून दुपारी २ ते ५ यादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.










