वाहन-मुक्त दिवस साजरा करण्यासाठी महापालिका सज्ज
झुंबा, लाईव्ह संगीत, पथनाट्य, नृत्यप्रदर्शन, खेळ यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ८ व ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पिंपरी बाजार परिसरात (साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक) पहिला वाहन-मुक्त दिवस साजरा करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.


उपक्रमाचे उद्घाटन सकाळी ८ वाजता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे. याव्यतिरिक्त खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप,शंकर मांडेकर, आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे यांची सन्माननीय उपस्थिती यावेळी असणार आहे. या मान्यवरांसह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी दिली आहे.

वाहन-मुक्त दिनानिमित्त संपूर्ण पिंपरी बाजार क्षेत्र सुशोभित केले जाणार आहे. या वाहनमुक्त दिवसाचा मुख्य उद्देश नागरिकांना मोकळ्या रस्त्यांचा आनंद घेण्यास संधी देणे आहे, जिथे ते चालू शकतील आणि बाजार परिसराचा आनंद घेऊ शकतील. यासोबतच हा उपक्रम पिंपरी बाजारपेठेत पादचाऱ्यांसाठी आणि सायकलस्वारांसाठी पूरक वातावरण निर्मिती करणे, पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि प्रदूषण मुक्तीसाठी जनजागृती करणे यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये सातत्य ठेऊन असे उपक्रम आयोजित करून नागरिकांचा सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याशिवाय या उपक्रमाद्वारे नागरिक व विक्रेत्यांच्या/व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया, सर्वेक्षण व चर्चांद्वारे भविष्यातील आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठीही सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट – दोन दिवसीय उपक्रमात ‘या’ कार्यक्रमांचे होणार आयोजन
•रस्ते सुरक्षा, कमी प्रदूषण क्षेत्र, पादचारी मार्ग व सायकल ट्रॅकचे महत्त्व, सार्वजनिक वाहतूक आणि नागरिकांच्या सहभागावर चर्चासत्रांचे आयोजन.
•सर्व वयोगटांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रम.
•कार्यक्रमस्थळी संपूर्ण ५०० मीटर रस्त्यावर उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना.
•सार्वजनिक शौचालये आणि विश्रांतीसाठी स्वतंत्र व्यवस्था.
•झुंबा, हास्ययोग, लाईव्ह संगीत, पथनाट्य, नृत्यप्रदर्शन, खेळ यांसारख्या उपक्रमांचे आयोजन.
•८ मार्च – महिला दिनानिमित्त नृत्यप्रदर्शन, खेळ पैठणीचा, लाईव्ह संगीत, प्रश्नमंजुषा व अन्य मनोरंजनात्मक उपक्रम.
*चौकट – उपक्रमाचे मुख्य आकर्षण:*
•”चाय पे चर्चा” या कार्यक्रमात माजी नगरसेवक, पोलीस अधिकारी व नागरिक थेट साधतील संवाद.
•सार्वजनिक वाहतूकीस चालना देण्यासाठी नागरिकांमध्ये करण्यात येणार जनजागृती.
•चारचाकी, दुचाकी आणि इतर वाहनांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था.
वाहतूक मार्गात केलेले बदल:
•शगुन चौक येथे उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांसाठी केवळ डावीकडे वळण्याची परवानगी असेल.
•एमजी रोड रहिवाशांसाठी मर्यादित वेळेसाठी खुला राहील.
•शगुन चौक ते रिव्हर रोडकडे येणाऱ्या वाहनांनी डिलक्स चौकातून यू-टर्न घेऊन पुढे मार्गस्थ व्हावे.
•चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी पुढीलप्रमाणे मार्गांचा वापर करावा – उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांनी शगुन चौकात आल्यानंतर उजवीकडे वळावे, त्यानंतर डिलक्स चौक ओलांडून रामाबाई आंबेडकर चौकाकडे यावे आणि साधू वासवानी रोड मार्गे गेलॉर्ड चौक व साई चौकातून भुयारी मार्गाद्वारे एचएएल सशुल्क चारचाकी पार्किंग गाठावे.










