महायुतीच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती – भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया


– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पिंपरी-चिंचवड दौरा



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवडमधील विकासकामे आणि प्रलंबित प्रकल्पांना खोडा घालण्याचे काम करण्यात आले. मात्र, महायुतीच्या सत्ताकाळामध्ये शहराच्या विकासाला गती मिळाली. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन होत आहे. ही पिंपरी-चिंचवडकरांसाठी निश्चितच समाधानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विकासकामांचा उद्घाटन, भूमीपूजन तसेच उपक्रमांचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जाधववाडी, चिखली येथील एमएनजीएल पंपासमोर आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशित्रण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह खासदार, आमदार आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
… या प्रकल्पांचे होणार भूमिपूजन
भूमीपूजन होणाऱ्या प्रकल्पांमध्ये पिंपरी येथील सुविधा भुखंडावर उभारण्यात येणारे मध्यवर्ती अग्निशमन केंद्र आणि अग्निशमन प्रबोधिनी इमारत, आकुर्डी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवन जवळ उभारण्यात येणारे अग्निशमन केंद्र, मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड (२४ मीटर डी.पी रस्ता) व सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड (१८ मीटर डी.पी रस्ता) तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतचा १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच पवना नदीवरील मामुर्डी ते सांगवडे दरम्यान जोडणारा पूल या विकासकामांचा समावेश आहे.
… या प्रकल्पांचे होणार लोकार्पण
लोकार्पण होणाऱ्या विकासका उपक्रमांमध्ये स्मार्ट सिटीच्या वतीने GIS Enabled ERP अंतर्गत Core Application (SAP), Non-Core Application, E-office (DMS) आणि भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) मध्ये विकसित केलेली संगणक प्रणाली तसेच चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाची नवीन इमारत, शहरातील विविध ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ (वेस्ट टू वंडर) वस्तूंपासून निर्मिती केलेल्या टिकाऊ कलाकृती, महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींवर बसविण्यात आलेले रुफ टॉप सोलर सिस्टीम (सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प), सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (CHDC) उपक्रम, AI Driven Hoarding Detection and Surveillance System उपक्रम यांचा समावेश आहे.
’’ पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी 2017 मध्ये पिंपरी-चिंचवडकरांना शब्द दिला होता. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 2018 मध्ये पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. आयुक्तालयासाठी हक्काची जागा मिळण्याबाबत पुन्हा पाठपुरावा केला. त्यालाही महायुती सरकारच्या काळात मंजुरी मिळाली. पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगतीशील वाटचालीमध्ये मैलाचा दगड असलेल्या या ऐतिहासिक वास्तुची पायाभरणी होत आहे. याचे मनोमन समाधान वाटते.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.








