प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे निगडीत आयोजन


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विश्वकर्मीय समाज पिं-चिं शहर सामाजिक संस्था व सकल विश्वकर्मीय समाजाच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवानिमित्त भव्य रथयात्रा व मिरवणूक सोमवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सायं पाच ते आठ वा. या वेळेत काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत सुतार,लोहार, सोनार, शिल्पकार,तांबट या विश्वकर्मीय समाजाचे प्रतीक असलेल्या पंचरंगी ध्वजाचे अनावरण करण्यात आले.



श्री.मानकर पुढे म्हणाले कि, सदरील मिरवणुकीचा मार्ग आकुर्डी खंडोबा मंदीर चौक ते प्रभू विश्वकर्मा मंदिर यमुनानर निगडी या मार्गाने असणार आहे. या भव्य दिव्य रथयात्रा व मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये वारकरी संप्रदायांमधील परंपरा जपत जवळजवळ 150 वारकरी विद्यार्थी टाळ आणि मृदुंगाच्या नादामध्ये नामघोष करत या मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. या मिरवणुकीच्या निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे, सामाजिक प्रबोधन करण्याच्या दृष्टीने आरोग्य, शिक्षण व आर्थिक सक्षमीकरण तसेच इतर बाबतचे प्रबोधन या मिरवणुकीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. महाप्रसादाचे स्थळ प्रभू विश्वकर्मा मंदिर यमुनानगर निगडी येथे असणार आहे. या भव्य रथयात्रा व मिरवणुकीला भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, आमदार अण्णा बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याच्या परिसरातील म्हणजेच, खेड आंबेगाव जुन्नर मावळ मुळशी लोणावळा या परिसरामधील समाज बांधव माता भगिनी ह्या भव्य रथयात्रा मिरवणुकीला उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण सृष्टीचे सृजन कर्ता म्हणजेच विश्वाचे पहिले शिल्पकार व वास्तुकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे, सदर प्रभु विश्वकर्मा जयंती माघ शुद्ध 13 दरवर्षी मोठ्या उत्साहात महाराष्ट्रातील गावोगावी साजरी केली जाते.
पत्रकार परिषदेस लहू सुतार, भगवान श्राद्धे, अनिता पांचाळ,दत्तात्रय कदम, विठ्ठल गरुड, नारायण भागवत, सतीश सुतार, बारा बलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष भाई विशाल जाधव, सोहम मानकर, बाळासाहेब करडके , सागर पवार,जालिंदर दिवेकर, संजीव सुतार ज्ञानेश्वर सुतार,बालाजी पांचाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.









