सात दिवसात ४१६ अतिक्रमने निष्कासित वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएचा पुढाकार


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाकडून अनाधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु आहे. गत सात दिवसात 416 अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएच्या पथकामार्फत कारवाई करण्यात आली. या संदर्भात मा. पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने गत सात दिवसापासून विविध भागातील अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस आयुक्तालय यांनी संयुक्तपणे वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी येथून धडक कारवाईला सुरूवात केली आहे.



अनधिकृत बांधकामावर २९ जानेवारीपासून कारवाई करण्यात येत असून ०४/०२/२०२५ पर्यंत एकूण ४१६ वाहतुकीस अडथळा करणारे रस्त्यावरील अतिक्रमित व अनधिकृत बांधकाम केलेले स्ट्रक्चर यामध्ये दुकाने / गाळे / आरसीसी स्ट्रक्चर / सीमा भिंती / तात्पुरते पत्राशेड / होर्डिंग्ज (फलक) इत्यादी हटविण्यात आले. या कारवाईमुळे त्या परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यापूर्वी १७ जानेवारी २०२५ रोजी हिंजवडीतील लक्ष्मी चौकात आणि २३ डिसेंबर २०२४ रोजी नवले ब्रीज येथे प्राधिकरणातर्फे मोठी कारवाई झाली होती. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे हद्दीतील अनधिकृत बांधकामधारकांनी सदरची अनधिकृत बांधकाम थांबविणेबाबत नोटिस प्राप्त झाली असता बांधकाम सुरूच ठेवले तर उक्त अधिनियमाप्रमाणे कारवाई चालू राहिल असे उपजिल्हाधिकारी तथा सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

संबंधित कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाच्या सह आयुक्त (प्र) डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार रविंद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता अभिनव लोंढे, विष्णू आव्हाड, गणेश जाधव व इतर यांनी पार पाडली.
या भागात होणार पुढील कारवाई
आगामी काही दिवसात पुणे-सातारा, पुणे-सोलापूर, मुळशी-पौड, चांदणी चौक ते पिरंगुट या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा आणणारे अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे पाडण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने लवकरच सर्व्हेक्षणासाठी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे.








