अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कुल, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य संतोष ढोरे, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव उपस्थित होते.



राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सांगवीतून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत ‘मुलगी वाचवा, मुलगा-मुलगी भेदभाव करू नका, पर्यावरण वाचवा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला होता. यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी परेड सादर करीत सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी शिक्षिका प्रीती पितळे यांच्यासोबत भारताचे संविधान सादर केले. तसेच गतवर्षी दहावी व बारावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. समूहगीत, देशभक्तीपर गीत, बांबू ड्रिल सादर केले. “श्रीराम जय राम जय जय राम’ या गीतातून आपण एक सुजाण नागरिक म्हणून कसे वागले पाहिजे, याचा संदेश देण्यात आला.
संतोष ढोरे व अतुल शितोळे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. आरती राव म्हणाल्या, देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा किंवा पंथाचा असो, प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभक्तीने साजरा करतो. आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. प्रणव राव यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगून नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका सुषमा पवार, स्मिता बर्गे, नीलम मेमाणे, दर्शना बारी, भटू शिंदे, उदय फडतरे, अक्षय नाईक यांनी केले.
सूत्रसंचालन पर्यवेक्षिका स्मिता बर्गे यांनी केले. विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








