नवीन उद्योगांकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहिले पाहिजे : कौस्तुभ कुलकर्णी


इंद्रायणी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –
सुदृढ, सशक्त समाजासाठी आरोग्य, शिक्षण व्यवस्थेसोबतच नवीन उद्योग उभारणी गरजेची असते. अलीकडच्या काळात आरोग्य, शिक्षण, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनीही काळानुरूप बदल स्वीकारून आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. नवीन संधीकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहिले पाहिजे, असे मत एमिटेक टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी कौस्तुभ कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी महाविद्यालयात ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे हे होते. याप्रसंगी खजिनदार शैलेश शहा, उद्योजक संजय साने, निरुपाताई कानिटकर, युवा उद्योजक रणजीत काकडे, युवराज काकडे, विलास काळोखे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. संजय आरोटे, तसेच कॉन्टिनेन्टल इंटरनॅशनल ग्रुपचे पदाधिकारी, ह्युंदाई कंपनीचे मिस्टर किम, उद्योजक प्रशांत बोरा आदी उपस्थित होते. दरम्यान, संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले.
मिस्टर किम यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांनी काहीतरी साध्य करण्यासाठी वेळेचे नियोजन केले पाहिजे. ध्येय उच्च असेल, तर यशस्वी होता येते, हा संदेश देत हरियाणा, आंध्रप्रदेशसह महाराष्ट्रातील ह्युंदाईच्या यशस्वीतेचा आढावा घेतला.
रणजीत काकडे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग उभे राहिले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी कोरियन लोकांच्या कामाच्या पद्धतीचे आत्मपरीक्षण करून त्यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे. प्रशांत बोरा म्हणाले, की संधीची समानता या उद्देश पत्रिकेतील शब्दांप्रमाणे संधीची वेळ ओळखता आली पाहिजे. ज्ञान हेच तुम्हाला हक्क मिळवून देणारे आहे. देशाला पुढे नेण्यासाठी ज्ञानाची ताकद पणाला लावा.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले.
त्यांनी संस्थेच्या कार्याची घोडदौड अधोरेखित केली. तसेच संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी प्रियंका इंगळे हिने नुकत्याच पार पडलेल्या खो-खो विश्वचषकचे नेतृत्व करत भारताला खो-खोमध्ये यश मिळवून दिल्याबद्दल कौतुक केले.
चंद्रकांत शेटे यांनी संस्थेतील विकासाच्या प्रगतीचा आढावा घेत सर्वांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाचा समारंभ यशस्वीपणे पार पडला. सूत्रसंचालन प्रा. आर.आर. डोके यांनी केले.








