महापालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे. तरी नागरिकांनी या समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.



महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात होणाऱ्या या मुख्य राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमाच्या प्रारंभी, सकाळी ७.५० वाजता भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (सरनामा) सामुहिक वाचन करण्यात येणार असून त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम नियोजित वेळेत संपन्न होईल. या समारंभास शहरातील लोकप्रतिनिधी, माजी नगरसदस्य, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय हा सोहळा नागरिकांना घरबसल्या देखील पाहता येणार असून महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनेल वरून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या हस्ते, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या हस्ते, औद्योगिक प्रशिक्षण विभागामध्ये संस्थेचे प्राचार्य तर विभागीय कार्यालयांमध्ये संबंधित शाखाप्रमुख यांच्या हस्ते रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण समारंभ संपन्न होणार असून तत्पुर्वी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (सरनामा) सामुहिक वाचन देखील करण्यात येणार आहे.
ध्वजारोहण समारंभानंतर सकाळी १० वाजता निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे “झंडा ऊँचा रहे हमारा” हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतिकारकांना देशभक्तीपर गीतांद्वारे अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी साडेपाच वाजता पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील मैदानात ‘’हम भारत के लोग’’ या १५० कलावंतांनी साकारलेल्या, विविध १५ भाषेतील सुप्रसिद्ध गायकांचा समावेश असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.








