लोकसाहित्य हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचा गाभा – ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव


पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ” लोकसाहित्य हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचा गाभा असून, जुनी शिल्पं, शिलालेख, लोकगीते जतन करणे काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी केले.



ज्येष्ठ नागरिक संघ धनकवडी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण मंडळाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी लोकाकलेतून लोकशिक्षण या विषयावर श्री यादव बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाजीराव गायकवाड, कवी जगदीप वनाशिव, सोमनाथ नाईक, भालचंद्र निखळ, बबन मांढरे, रामचंद्र चव्हाण, शकुंतला झगडे, सुनिता वाघमारे, प्रमोद पाटील श्री अकोलकर, श्री मधुकर नवले, आदी उपस्थित होते.

श्री यादव म्हणाले, ” पूर्वीच्या काळी दशावतार, कीर्तन, भजन, गोंधळ, लावणी, तमाशा, वासुदेव, बहुरूपी, शाहिरी या माध्यमातून समाजाचे प्रबोधन आणि मनोरंजन व्हायचे. वारकरी संप्रदायाचा डोलारा संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत एकनाथ आदी संतांनी कीर्तन, प्रवचन, भजन, भारुड सादर करून लोक जागृती केल्यामुळे ऊभा राहिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहिरांनी पोवड्याच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंदोलनात, कवी, शाहीर यांचा मोठा सहभाग होता. लावणी, तमाशा, वासुदेव, यांनी लोकाकालेतून लोकजागृती केली.”
लोकदेव श्रीखंडोबा आणि लोकदेव विठोबा ही महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा जतन करणारी ऊर्जा केंद्र आहेत असे सांगून श्री यादव यांनी लोककलेचा ठेवा भाषणातून उलगडून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी श्री वनशिव यांनी कविता सादर केली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजीराव गायकवाड यांनी केले. सूत्रसंचलन शकुंतला झगडे यांनी केले.








