ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरीशिक्षण
शहराचे नाव आता शिक्षण क्षेत्रात देखील पुढे – आमदार शंकर जगताप
व्हीनस आर्ट फाउंडेशनचा डिझाईन एज्युकेशन फेअर उपक्रम स्तुत्य - डॉ. गिरीश देसाई


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कामगार नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराचे नाव आता शिक्षण क्षेत्रात देखील पुढे येत आहे. यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ व डी. वाय. पाटील विद्यापीठ यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तसेच मागील पंधरा वर्षांपासून डिझाईन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्हीनस आर्ट फाउंडेशनचा देखील गौरवाणे उल्लेख करावा लागेल असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.
व्हिनस आर्ट फाउंडेशनच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ, दिशा सोशल फाउंडेशन यांच्या सहयोगाने “पीसीएमसी डिझाईन एज्युकेशन फेअर २०२५” चे उद्घाटन चिंचवड ऑटो क्लस्टर येथे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, व्हिनस आर्ट फाउंडेशनच्या चेअरमन अपूर्वा पाटील, अमर पाटील, संतोष निंबाळकर विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रविवार पर्यंत सुरू असणाऱ्या या फेअर मध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना व पालकांसह सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. डिझाईन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी देशभरातील डिझाईन कोर्स उपलब्ध असणाऱ्या विद्यापीठांची माहिती दालने उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये पीसीईटी डिझाईन स्कूल अँड पीसीयू आर्किटेक्चर कॉलेज, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी, एमआयटी स्कूल ऑफ डिझाईन आळंदी, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयटी) अहमदाबाद गुजरात, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) न्यू मुंबई खारघर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्ट अँड डिझाईन (आयआयसीडी) अँड आयआयटी बॉम्बे, चित्रकूल एनआयडी क्लासेस चिंचवड, इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन निरमा यूनिवर्सिटी अहमदाबाद गुजरात, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी (एमआयटीएडीटी) लोणी काळभोर, महिंद्रा युनिव्हर्सिटी हैदराबाद, एरेना ॲनिमेशन पुणे आदींचा समावेश आहे.
प्रमुख पाहुणे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, डिझाईन क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. या क्षेत्रात देखील उत्कृष्ट करिअर करता येते. आज प्रत्येक क्षेत्रात डिझाईन अत्यावश्यक आहे. वस्तू विक्रीसाठी सादरीकरण खूप महत्त्वाचे आहे. हे सादरीकरण (दृश्य कलेच्या) डिझाईनच्या माध्यमातून उत्कृष्टपणे करता येते. या नव्याने विस्तारणाऱ्या क्षेत्रात जागतिक पातळीवर करिअर करण्यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ देशभरातील तसेच जगातील विद्यार्थ्यांना संधी अवलंबून उपलब्ध करून देत आहे. व्हिनस आर्ट फाउंडेशनचे अपूर्वा पाटील व अमर पाटील विद्यार्थ्यांना उत्कृष्टपणे मार्गदर्शन करत आहेत.
प्रास्ताविक अपूर्वा पाटील, सूत्रसंचालन नाना शिवले, आभार संतोष निंबाळकर यांनी मानले.








