ताज्या घडामोडीपुणे

विद्यापीठ चौक ते गणेश खिंड रस्त्याची कोंडी सुटणार पीएमआरडीएचा पुढाकार

Spread the love

एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन लॉ कॉलेज समोरील जागा उपलब्ध

पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आगामी ५० वर्षाच्या वाहतुकीचा विचार करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पुणे विद्यापीठ चौकामध्ये मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन लॉ कॉलेजच्या समोरील रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागा उपलब्ध नव्हती. या उड्डाणपुलाचे बांधकामासाठी प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने पुणे मनपाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार लॉ कॉलेज समोरील (मौजे औंध सर्वे नंबर ८५/८६ (सिटीएस नं. १४४८) मधील रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जागा पीएमआरडीएच्या पुढाकाराने उपलब्ध करुन द‍िल्याने रहदारीचा मार्ग मोकळा होणार असून संबंध‍ित जागेची ताबा पावती आज दि. २४ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आली.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक व गणेशखिंड रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमआरडीएमार्फत उपाययोजना करण्यात येत आहे. यात पुणे विद्यापीठ चौकामध्ये मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम प्रगतीत असून अस्तित्वातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी गणेशखिंड रस्ता व पाषाण रस्ता या दोन्ही रस्त्यांचे मुख्य विद्यापीठ चौकामध्ये पुणे मनपाच्या विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरण्‍यासाठी प्राधिकरण व पुणे मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे संस्थेसमवेत कार्यवाही प्रगतीत होती.

प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल आवारातील रस्ता रुंदीकरणास आवश्यक असलेली जागा यापूर्वी उपलब्ध करून द‍िली होती. मात्र पाषाण रस्त्यावरील प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन लॉ कॉलेज समोरील रस्ता रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे आज दि.२४ जानेवारी रोजी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, मुख्य अभियंता र‍िनाज पठाण यांच्या उपस्थितीत प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने पुणे मनपाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार त्यांच्या मॉर्डन लॉ कॉलेज समोरील (मौजे औंध सर्वे नंबर ८५/८६ (सिटीएस नं. १४४८) मधील रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली असून पीएमआरडीएने द‍ि. २४ जानेवारी रोजी ताबा पावती केली आहे. या मॉर्डन लॉ कॉलेज परिसरातील बाधित होत असलेले बॉटन‍िकल गार्डन, कॅन्टीन व इतर बाबींचे इतरत्र स्थलांतर प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमार्फत करणेसाठी प्राधिकरणामार्फत रु. ५२.०० लक्ष इतका निधी उपलब्ध करून दिला.

सोमवार दि. २७ जानेवारी २०२५ पासून सदर ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम पुणे मनपामार्फत सुरु करणे प्रस्तावित आहे. त्यामुळे मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या पाषाण बाजूकडील रॅम्पचे काम सुरु करणे शक्य होणार असून आगामी काळात वाहतूक कोडीच्या समस्यांपासून नागर‍िकांना द‍िलासा म‍िळणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button