बांबूत उद्योगक्रांती घडवण्याची क्षमता – अजित ठाकूर


पुणे बांबू महोत्सव-२०२५ चा प्रारंभ



पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “पुणे बांबू फेस्टिव्हल हा केवळ उत्सव नाही; तर तो हरित आणि शाश्वत भविष्याकडे एक पाऊल आहे. बांबूमध्ये उद्योगांमध्ये क्रांती घडवण्याची आणि समाज सशक्त करण्याची क्षमता आहे,” असे विचार बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे संचालक अजित ठाकूर यांनी मांडले.

स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंच येथे बहुप्रतीक्षित पुणे बांबू महोत्सव २०२५ च्या तिसऱ्या हंगामाचे गुरुवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. महाराष्ट्र चॅप्टरच्या बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने व येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित हा ‘ग्रीन गोल्ड’ महोत्सव २३ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान रोज सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत पुणेकरांना पाहण्यासाठी खुला राहणार आहे.
या प्रदर्शनासाठी उपस्थित असणाऱ्या प्रथम दोन प्रेक्षक नवनीता क्रिश्नन व विकी बारवकर यांच्या हस्ते फित कापून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी, बोलताना एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ डिजाईनचे संचालक डाॅ.नचिकेत ठाकूर म्हणाले, बांबू, ज्याला ‘ग्रीन गोल्ड’ म्हणून ओळखले जाते, जगातील सर्वात वेगाने वाढणारी गवत आहे आणि टिकाव व बहुउपयोगीपणाचे प्रतीक आहे. कचरा शून्य तत्त्वावर आधारित बांबूचा उपयोग बांधकाम, हस्तकला, पर्यावरण संरक्षण आणि खाद्यपदार्थांमध्ये देखील होतो. बांबूच्या याच उपयोगीता लक्षात घेवून नवकल्पानांना प्रोत्साहित करण्यासाठी व बांबू विश्वाची लोकांना अनूभूती घडविण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
*इंटरएक्टिव्ह विज्ञान प्रदर्शन*
या महोत्सवात नेहरू सायन्स सेंटर, मुंबईतर्फे एक इंटरएक्टिव्ह विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे हे प्रदर्शन विज्ञान व टिकाव या संकल्पनांवर आधारित शैक्षणिक आणि मनोरंजक माहिती देईल.
*महोत्सवाची वैशिष्ट्ये*
या फेस्टिव्हलमध्ये बांबूच्या विविध उपयोगांवर आधारित कार्यक्रम आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे:
*बांबू बांधकाम आणि डिझाइन:* अभिनव बांबू आर्किटेक्चरचे प्रदर्शन.
*हस्तकला प्रदर्शन:* सुंदर बांबू कलाकृतींचा संग्रह.
*उत्पादन विक्री:* योगा वियर, इनरवियर यांसारखे अनोखे बांबू उत्पादने.
*बांबू लागवड आणि प्रक्रिया:* बांबू उगवण्याचे व प्रक्रिया करण्याचे मार्गदर्शन.
*बांबू यंत्रसामग्री:* बांबू उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचे प्रात्यक्षिक.
*सक्षमीकरण कार्यक्रम:* महिलांसाठी आणि युवकांसाठी बांबू उपक्रमांद्वारे उद्योजकतेची संधी.








