मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त डिजीटल मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने १४ ते २८ जानेवारी २०२५ दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने २४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता डिजिटल मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.



या डिजिटल मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञ वक्त्यांचा समावेश असणार आहे. त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून वाचनवेल फाऊंडेशनच्या रुपाली सोनवणे, रीडर्स डायसच्या संस्थापिका तृप्ती मुंडे आणि लेखिका शीतल दरांदळ हे मान्यवर गुगल मीटद्वारे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार असून मराठी भाषेतील साहित्याच्या विविध पैलुंवर मार्गदर्शन करणार आहेत.

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देणारा आहे. तसेच लेखक आणि वाचकांसाठी हे एक आगळेवेगळे व्यासपीठ असून, मराठी वाचनाची कला आणि साहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्व वयोगटांमध्ये मराठी भाषेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी महानगरपालिकेचा एक महत्वाकांक्षी प्रयत्न आहे. तरी जास्तीत जास्त वाचकांनी या संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
नागरिकांनी २४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता डिजीटल मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी खालील Google Meet लिंकवर क्लिक करावे:
https://meet.google.com/pwu-mfpw-rib
याव्यतिरिक्त, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत YouTube चॅनेलवर उपलब्ध असणार आहे.
डिजिटल साहित्य संमेलनामध्ये मराठी साहित्याच्या विविध पैलूंवर चर्चा होणार आहे. याद्वारे वाचनाची सवय वाढवणे, सर्जनशील लेखनाला चालना देणे आणि मराठी भाषा डिजिटल माध्यमांद्वारे कशी पुढे नेली जाऊ शकते यावर विशेष भर दिला जाणार आहे. हे संमेलन केवळ मराठी साहित्याचा प्रचार करण्यासाठी नाही, तर समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि मराठी भाषेच्या वाढीसाठी महत्त्वाचे ठरेल.
– निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, माहिती व तंत्रज्ञान विभाग, पिं. चिं. मनपा








