प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधानाला १५ भाषेमध्ये विश्वविक्रमी मानवंदना


पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘आम्ही भारताचे लोक’ कार्यक्रमाचे आयोजन, १५० पेक्षा जास्त गायक – कलाकार होणार सहभागी



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय संविधानाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी तसेच भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ तसेच संविधानाला सांगीतिक मानवंदना देण्यासाठी आम्ही भारताचे लोक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नागरिकांना केले.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आम्ही भारताचे लोक ( हम भारत के लोग) हा कार्यक्रम रविवारी, २६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित करण्यात आला आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, मल्याळम, भोजपुरी, कन्नड, उर्दु, संस्कृत, नेपाळी, कोकणी, पाली आदी विविध १५ भाषांमध्ये संविधानाची प्रस्ताविका गायनाने भारतीय संविधानाला सांगीतिक मानवंदना देण्यात येणार असून याची ग्रीनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात येणार आहे.
लोकप्रिय गायकांचा सहभाग
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये लोकप्रिय पंजाबी गायिका गिन्नी माही, अंजली बौद्ध, लोकप्रिय गुजराती गायक विशान काथड, भोजपुरी गायक ओंकार प्रिन्स, मल्याळम गायक सिद्धेश, कन्नड गायक नारायणस्वामी, प्रशांत शिराळे (हिंदी), विजय बनगे (मराठी), सनी समुद्रे (इंग्रजी), शफिक मुल्ला (उर्दु), ममता ठाकूर देसाई (संस्कृत), मार्गेश पाटील (नेपाली), पंडित राठोड (कोकणी), सुजीत म्हेत्री (कन्नड), सिद्धराज पाटील (गुजराती) डॉ. महेंद्र कानडे (पंजाबी), रणजित शिवशरण (पाली) यासह जवळपास १५० कलाकारांचा संगीतमय नाट्याविष्कार पाहायला मिळेल.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. भारतीय संविधानाला विश्वविक्रमी मानवंदना देण्यासाठी यंदा प्रजासत्ताक दिनी ‘आम्ही भारताचे लोक’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये तब्बल १५ विविध भाषांमध्ये संविधान प्रास्ताविकेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये विविध राज्यातील कलाकार सहभागी होणार असून पिंपरी चिंचवड शहरातील हा कार्यक्रम विश्वविक्रमी ठरेल, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
तरीही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.








