शेतकरी कुटुंबातील आयटीएन्स धनेश इंदोरे याचा प्रवास प्रेरणादायी! – भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचे गौरोवोद्गार


– ‘टेकऑर्बिट’ कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आंबेगाव तालुक्यातील मंचरचा सुपुत्र आणि शेतकरी कुटुंबातील अभियंता धनेश इंदोरे याचा प्रवास नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. विदेशातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्याने ‘टेकऑर्बिट’ नावाची कंपनी सुरू केली आणि अल्पावधीत यशाची शिखर गाठले. त्याच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान अमूल्य आहे, असे गौरोवोद्गार भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी काढले.

पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील युवा उद्योजक धनेश इंदोरे सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या धनेश इंदोरे यांना कोविड महामारीपूर्ण जागतिक दर्जाच्या कंपनीमध्ये विदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. कोविड महामारीत मायदेशी परतलेल्या धनेश यांनी ‘टेकऑर्बिट’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीचा 5 वा वर्धापन दिन पुण्यात दिमाखात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश लांडगे उपस्थित होते.
धनेश इंदोरे यांनी 2020 मध्ये ‘टेकऑर्बिट’ कंपनी सुरू केली. त्यावेळी कंपनीकडे 6 कर्मचारी होते. गेल्या पाच वर्षांच्या वाटचालीमध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या 250 वर पोहोचली आहे. तसेच, आतापर्यंत देश-विदेशातील विविध 80 प्रकल्प कंपनीने पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, ‘टेकऑर्बिट’ने Microsoft आणि SAP या जगविख्यात कंपन्यांची गोल्ड पार्टनरशिप मिळवली आहे. Google, AWS, Salesforce आणि OpenText यांसारख्या कंपन्यांचे ते सेवा भागीदार आहेत.
कंपनीचे पुणे येथे मुख्य कार्यालय असून, भारतातील प्रमुख मेट्रो शहरांमध्ये तसेच अमेरीका, युरोप, आणि अखाती देशांमध्ये आंतरराष्ट्रीय कार्यालये आहेत. कंपनी ISO आणि CMMI लेवल 5 प्रमाणपत्रांसह उच्च दर्जाची सेवा पुरवते. धनेश इंदोरे आणि टेकऑर्बिटच्या यशस्वीतेचे प्रमाण त्यांच्या मूल्यांवर आधारित समर्पण आणि अथक परिश्रम याचे प्रतिक आहे.
उद्योजक धनेश इंदोरे, मंचर येथील शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेला एक तरुण आणि आता पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी आहे. त्यांनी आयटी क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. मी धनेशच्या वडिलांच्या चेहऱ्यावर दिसणारी समाधानाची भावना पाहून आनंद झाला. शेतकरी कुटुंबातील एक मुलगा आयटी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतो, ही निश्चितच प्रेरणादायी बाब आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.








