त्रिवेणीनगर स्पाईन रोडच्या भूसंपादनाला ‘बुस्टर’


– पुणे जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनासाठी निधीला मंजुरी
– भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मौजे तळवडे येथे त्रिवेणीनगर चौक येथील 90 मीटर रुंद रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2008 पासून या रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी प्रलंबित होते. अखेर भूमिसंपादनासाठी 15 कोटी 43 लाख 42 हजार 984 रुपयांना जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेला ‘बुस्टर’ मिळाला आहे.

निगडी-भोसरी स्पाईन रस्त्याला अडथळा ठरणारी त्रिवेणीनगर चौकातील बांधकामे हटवण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील होते. मात्र, भूसंपादन आणि रस्ता बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने (PCNTDA) निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते मोशी-भोसरी प्राधिकरण (नाशिक महामार्गावरील राजा शिवछत्रपती चौक) दरम्यान स्पाईन रस्ता विकसित केला आहे. 2011 मध्ये त्याचे काम पूर्ण झाले होते. मात्र, महापालिकेच्या हद्दीलगतच्या त्रिवेणीनगर येथील बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न न सुटल्यामुळे सुमारे 320 मीटर लांबी व प्रस्तावित 90 मीटर रुंदीचा रस्ता गेल्या 14 वर्षांपासून रखडला हेता. भूसंपादन कामासाठी भरपाई देण्याकरिता आमदार महेश लांडगे यांनी जिल्हा प्रशासन आणि भूमि संपादन विभागाकडे सातत्त्याने पाठपुरावा केला आहे.
दरम्यान, भूसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कमल 26 ते 30 च्या तत्त्वानुसार जमीनीच्या बाजारभावाच्या परिगणनेसह, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 126 (4) च्या तरतुदीसह भूमि संपादक अधिनियम 1894 चे कलम 11 (1) नुसार 15408.98 चौ. मी. क्षेत्र भूसंपादनासाठी 15 कोटी 43 लाख 42 हजार 984 भरपाई रक्कम भूमी संपादन विशेष अधिकारी स्मृती कुलकर्णी यांनी मंजुर केली आहे.
त्रिवेणीनगर चौकातील स्पाईन रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास दुर्गानगर, तळवडे, निगडी आणि भोसरीकडून येणाऱ्या वाहनांमुळे होणारी चौकातील कोंडी सुटणार आहे. आळंदी-पुणे पालखी मार्ग, नाशिक महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग व द्रूतगर्ती मार्ग जोडला जाईल. या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.








