पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणप्रेमी सायकलस्वारांचा ‘‘कुंभमेळा’’


– इंद्रायणी नदी संवर्धन जागृतीसाठी 35 हजार सायकलपटूंची रॅली
– भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचा विश्वविक्रमी उपक्रम



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन जागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन-2025’’निमित्ताने भोसरीमध्ये पर्यावरण प्रेमींचा अक्षरशः कुंभमेळा भरला. सुमारे 35 हजार पर्यावरण प्रेमी, नागरिक, सायकलस्वार या रॅलीमध्ये सहभागी झाले. भोसरी येथील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर विश्वविक्रमी सायकल फेरी उत्साहात आणि निर्विघ्नपणे संपन्न झाली.

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, शिवांजली सखी मंच, सारथी हेल्पलाईन यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था, संघटना आणि पर्यावरण प्रेमी स्वयंसेवकांच्या पुढाकाराने ‘‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन-2025’’ चे आयोजन करण्यात आले.
यावेळी उत्तरप्रदेश येथील प्रभू श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज, ह.भ.प. संग्रामबापू पठारे महाराज, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, ॲड. सतीश गोरडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गेल्या वर्षी सायकल पटूंची सर्वात मोठी रांग म्हणून रेकॉर्ड स्थापित केलेल्या या उपक्रमाने यंदाही स्वतःचेच रेकॉर्ड मोडले. तीर्थक्षेत्र प्रयाग येथे भरलेल्या कुंभमेळ्याप्रमाणे भोसरीमध्ये रविवारी पर्यावरण प्रेमींचा महामेळा भरल्याचे चित्र होते. सकाळी पाच वाजल्यापासून भोसरीमध्ये चैतन्याचे वातावरण सळसळत होते. मान्यवरांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवल्यानंतर या सायकल स्पर्धेला सुरुवात झाली. रॅलीमध्ये 5 , 15 आणि 25 किलोमीटर असे अंतर कापत सायकल पटूंनी शहरामध्ये पर्यावरणाची चळवळच उभी केली. प्रतिवर्षी ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ मोफत आयोजित केली जाते. यंदा सायक्लोथॉचे 9 वे वर्ष आहे. वाहतूकीचे नियम, रस्ता सुरक्षा या थीमवर आधारित इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ आयोजित केली. रॅलीमध्ये सहभागी सायकलपटूंना टी-शर्ट, मेडल आणि नाष्टाची व्यवस्था करण्यात आली होती.
दिव्यांग बांधवांचा सहभाग प्रेरणादायी…
यावर्षीच्या इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनमध्ये दिव्यांग बांधवांचा सहभाग लक्षवेधी आणि प्रेरणादायी ठरला. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाची झलक सायक्लोथॉनमध्ये दिसली. विशेष म्हणजे, इंद्रायणी नदीबाबत कृतज्ञता व्यक्त करीत गंगा आरती करण्यात आली. आगामी काळात इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प आणि नागरिकांमध्ये जनजागृती करुन नदीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी एजकुटीने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच, झुंबा डान्समध्ये आमदार महेश लांडगे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी ठेका धरला.
नदी संवर्धन म्हणजे शहराच्या निरामय आरोग्याचा गाभा आहे. नागरिक, सामाजिक संस्था, प्रतिनिधी स्वयंस्फूर्तीने नदी संवर्धनासाठी एकवटतात. त्यावेळी शहराचे आरोग्य सुरक्षित होत जाते. ‘‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’’सारख्या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ उभी राहील. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी झटलेल्या आणि सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार व्यक्त करतो. यंदाची रॅली महाकुंभ मेळ्याला समर्पित आहे. आपली संस्कृती आणि परंपरा यासाठी कटिबद्ध राहुयात, असे आवाहन करतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
गेली नऊ वर्ष पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने “इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’’ हा उपक्रम राबवला जात आहे. अनेक संस्था या माध्यमातून नदी संवर्धनासाठी एकत्र आल्या. नागरिक, युवा जोडले गेले. नदी संवर्धन म्हणजे एक प्रकारे आपले भविष्य आरोग्यदायी करण्याचा मूलमंत्र आहे. ही प्रेरणा प्रत्येकाच्या मनात या माध्यमातून रुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमात युवा वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला जात असून युवकांच्या माध्यमातून नदी, पर्यावरण आणि आपले शहर नक्कीच स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न प्रत्यक्षात उतरणार आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.








