पर्पल जल्लोष – दिव्यांगांच्या महाउत्सवाच्या आज समारोप समारंभाला राज्यपाल येणार


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने १७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्पल जल्लोष – दिव्यागांचा महाउत्सव’ कार्यक्रमाचा समारोप समारंभ १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या समारोप समारंभास महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपस्थित राहणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.



केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या विशेष उपस्थितीत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्राच्या प्रांगणात होणाऱ्या या समारंभास राज्याचे उच्च व तंत्रशित्रण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह या क्षेत्रातील खासदार आणि आमदार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पर्पल जल्लोष – दिव्यांगांच्या महाउत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. १९ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दिव्यांगांनी निर्मित केलेल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील चित्रपट सादर केले जाणार असून त्यावर चर्चात्मक संवाद देखील होणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात समारोपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पर्पल जल्लोष कार्यक्रमात सॉल्वथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय विविध व्यक्तींचे सत्कार देखील यावेळी करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
माहिती व जनसंपर्क विभाग








