ताज्या घडामोडीपिंपरी

महापुरुषांचे विचार आत्मसात करुन मार्गक्रमण करीत राहणे म्हणजे थोर महापुरुषांचे पूजन करणे होय- सिध्दनाथ घायवट

Spread the love

 

थेरगाव (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – थेरगाव येथे स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त कार्यक्रमात राज्यस्तरीय युवा समाजभूषण पुरस्कारप्राप्त श्री सिध्दनाथ घायवट जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

आजची युवा पिढी ही आपल्या थोर महापुरुषांच्या तथा आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या जयंती वा पुण्यतिथी साजरी करत असते. या साजरीकरणात प्रतिमापूजन, हरिद्राकुंकुम् समर्पण,पुष्पहार अर्पण किंवा मग मिरवणूक वा जलसा वगैरे आयोजिले जाते आणि त्याद्वारे महापुरुषांचे पूजन केले जाते; परंतु या सर्व खटाटोपांशिवाय महापुरुषांचे विचार तथा आदर्श मार्गदर्शन हे आपल्या स्वतःमध्ये बिंबवून तथा आत्मसात करून तद्मार्गाने मार्गक्रमण करीत राहणे याच्यातूनच थोर महापुरुषांचे पूजन हे खर्या अर्थाने साध्य होत राहील असे वक्तव्य श्री सिध्दनाथ घायवट जोशी यांच्या वतीने करण्यात आले.

राजमाता जिजाऊंनी बाल शिवबाला घडवत असताना रामायण, महाभारत आदींच्या गोष्टी शिकवत लहानाचे मोठे करत स्वराज्याची पायाभरणी केली; परंतु प्रगल्भ बुध्दीमत्तेने परिपूर्ण असणारी आजची पिढी ही फेसबुक, इन्स्टा, रील्स या सारख्या माध्यमांमध्ये स्वतःला व्यतीत ठेवते यातून शिवराय, स्वामी विवेकानंद, संभाजी महाराज, जिजाऊ, सावित्रीबाई किंवा अन्य कुणी आजच्या युगातील महापुरुष कसा काय घडू शकेल? असा ही प्रश्न श्री सिध्दनाथ घायवट जोशी यांनी उपस्थित केला.

खेळीमेळीच्या तथा सहज संभाषण स्वरूपी या कार्यक्रमात राज्यस्तरीय युवा समाजभूषण पुरस्कार विजेते तथा युवा वक्ते श्री सिध्दनाथ घायवट जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संदीप जाधव, मयुर पाटील, रविकिरण देशमुख, श्रीराम भालेकर आदींनी परिश्रम घेतले तर सदर कार्यक्रमात थेरगाव, वाकड, रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा परिसरातील आबालवृद्ध उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button