ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण
भारतात आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक व रोजगाराच्या अनेक संधी – डॉ. सचिन देवी


‘जागतिक उद्योजक परिषद २०२५’ मध्ये तज्ञांचा सहभाग
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतामध्ये लोकसंख्येत वेगाने वाढ होत आहे. रोज नव्याने होणाऱ्या संशोधनामुळे तंत्रज्ञान देखील विकसित होत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून वैद्यकीय, आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक व रोजगाराच्या अनेक नवनवीन संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन अमेरिकेतील परफेक्ट व्हर्च्युअल टीमचे संस्थापक व सीईओ डॉ. सचिन देवी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु), गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘जागतिक उद्योजक परिषद २०२५’ च्या या परिसंवादामध्ये आपले मत व्यक्त करताना डॉ. सचिन देवी बोलत होते.
या परिसंवादामध्ये फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाचे महासंचालक के. राजा भानू, केमिन फार्मा एलएलसीचे अध्यक्ष व सीईओ उदय खिरे, इंडो लॅटिन अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक राजकुमार शर्मा, एचसीएएच इंडियाचे उपाध्यक्ष गौरव ब्रह्मभट, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी फार्मासिस्टसाठी शैक्षणिक मॉडेल तयार करण्याच्या दृष्टीने भाषण झाले आणि एमईडीसीचे उपाध्यक्ष सचिन इटकर यांनी सहभाग घेतला.
या परिसंवादामध्ये आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रातील नवकल्पना आणि व्यावसायिक वातावरण, संधी, नव तंत्रज्ञानाचा वापर, नियमात्मक चौकट आणि जागतिक सहकार्य या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
डॉ. सचिन देवी यांनी डेटा अॅनालिटिक्स, ऑटोमेशन आणि डेटा-आधारित धोरणांद्वारे आरोग्य व्यवस्थापन कसे सुधारणे शक्य आहे याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. ऑटोमेटेड इंटेलिजंट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मचा आरोग्य क्षेत्र कामकाजातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयोग होईल असेही डॉ. देवी यांनी सांगितले. डॉ. देवी यांची कंपनी जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एआयओसीडीच्या सहकार्याने फार्मास्युटिकल घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि उत्पादकांच्या कार्यक्षमतेसाठी एक व्यासपीठ तयार करून नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवित असल्याचे सांगितले.
फार्मास्युटिकल्स एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाचे महासंचालक के. राजा भानू यांनी सांगितले की, इंडो लॅटिन अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक राजकुमार शर्मा यांनी लॅटिन अमेरिकेकडे आरोग्य निर्यातीसाठी विस्ताराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
एचसीएएच इंडियाचे उपाध्यक्ष गौरव ब्रह्मभट्ट यांनी डिजिटल आरोग्य उपाय आणि रुग्ण सेवेमधील नवकल्पनांबाबत मार्गदर्शन केले.
भारताच्या आरोग्य क्षेत्रातील अमर्याद संधी आणि नवकल्पना व तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्योजकांना या आव्हानांचा सामना करून संपूर्ण क्षमतेने विकास कसा साधता येईल याविषयी मार्गदर्शन झाले.








