भुशी ग्रामस्थांचा जिव्हाळ्याचा गावठाणाचा विषय तब्बल १०० वर्षानंतर मार्गी लागला; भुशी ग्रामस्थांकडून आमदार सुनील शेळके यांचे जोरदार स्वागत


लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शंभर वर्ष होऊन गेले तरी भुशी गावाला गावठाण उपलब्ध नसल्याने तेथील घरांच्या नोंदी होत नव्हत्या. तसेच कोणत्याही जागेचा सिटीसर्वे देखील होत नव्हता. येथील ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा करत मार्गी लावला आहे. येत्या महिनाभरात गावातील सर्व घरांचा व त्यांच्या समोरील जागेचा सिटीसर्वे तयार होऊन त्याचे उतारे ग्रामस्थांना वाटप केले जाणार आहे. १६ जानेवारी रोजी भूमी अभिलेखच्या वतीने गावात सुनावणी घेत प्रत्येक ग्रामस्थांचे जागेची माहिती घेण्यात आली आहे. जनसंवाद यात्रेच्या निमित्त आमदार सुनील शेळके आज भुशी गावांमध्ये आले असताना सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.



यावेळी भुशी ग्रामस्थांनी त्यांचा पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा महत्त्वाचा विषय आमदार सुनील शेळके यांच्यासमोर मांडला तसेच लाईटची समस्या, भुयारी गटारे व सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतागृह आदी बाबत लेखी तक्रारी दिली आहेत. भुशी गावामध्ये पूर्वी असलेली पिण्याच्या पाण्याची टाकी एका खाजगी व्यक्तीच्या जागेमध्ये उभारण्यात आली होती. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाण्याची टाकी व त्याची क्षमता कमी पडत असल्याने त्या ठिकाणी नवीन टाकी बांधण्याचा ठराव लोणावळा नगर परिषदेने केला आहे. परंतु खाजगी जागा मालक मोठ्या आकाराची टाकी बांधण्यास हरकत घेत असल्याने ते काम थांबले असल्याचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले. त्यावेळी आमदार सुनील शेळके यांनी तुम्ही निविदा प्रक्रिया राबवा, खाजगी जागामालकाशी चर्चा करत पुढील सहा महिन्यांमध्ये या ठिकाणी पाण्याची टाकी उभी करून नागरिकांचा प्रश्न सोडवण्याची आश्वासन दिले आहे.

भुशी गावातील जीर्ण अवस्थेत असलेली शाळा पाडून त्या ठिकाणी नवीन शाळा बांधण्याचे देखील आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच मंदिरासमोरील शेड देखील दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्या या प्राधान्यक्रम ठरवत सोडवण्याचा शब्द त्यांनी दिला आहे.
भुशी गाव व रामनगर येथील नागरिकांचा उदरनिर्वाह हा भुशी धरण येथील पर्यटन व्यवसायावर होत असतो. मागील वर्षी रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी अतिक्रमण कारवाई राबवत दुकाने जमीनदोस्त केल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले होते. यावर्षी एप्रिल अथवा मे महिन्यात सर्व शासकीय यंत्रणा, व्यवसायिक यांची एकत्रित बैठक लावत नियोजनबद्ध धोरण ठरवत व्यवसायाला जागा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी नागरिकांना सांगितले.
लायन्स पॉईंट या ठिकाणी होत असलेल्या स्काय वॉक प्रकल्पाकडे जाण्यासाठी रस्ता रुंद करावा लागणार आहे. भुशी गावातून रस्ता रुंदीकरण करताना आवश्यक ती जागा ग्रामस्थांनी उपलब्ध करून द्यावी अथवा गावाच्या खालून व टाटा धरणाच्या मधून जर पर्यायी जागा असेल तर ती सुचवावी त्या ठिकाणाहून रस्ता केला जाईल. नागरिकांना विश्वासात घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेऊ नागरिकांनी देखील त्याकरता सहकार्य करावे असे आमदार सुनील शेळके यांनी यावेळी सांगितले.








