निगडीत हाेणार सात दिवसीय व्याख्यानमाला


तंत्रज्ञानाच्या काळात अध्यात्माची नितांत गरज – स्वामी स्वरूपानंद सरस्वती



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ”सध्याच्या काळ तंत्रज्ञानाचा असून यामध्ये तरूण, मध्यमवर्गीय, ज्येष्ठांसह सर्वांनाच अध्यात्माची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येकाने समाजाला समाेर ठेवून आत्मविश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे”, असे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी बुधवारी (दि.15) चिंचवड येथे आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.

श्रुतिसागर आश्रमाच्या वतीने निगडी, प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी, नवनगर विद्यालयामधील मनोहर सभागृहात संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणीचे बारा अभंगांवर माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या सुश्राव्य व्याख्यानमालेचे आयाेजन करण्यात आले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना स्वामी स्वरूपानंद सरस्वती बाेलत हाेते. यावेळी श्रुतिसागर आश्रमातील सदस्यांसह विविध मान्यवर उपस्थित हाेते.
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणीचे म्हणजे माेक्षांच्या अभंगावर दि.18 ते 24 जानेवारी या कालावधीत दरराेज सायंकाळी साडेसहा ते आठ वाजता व्याख्यानमाला हाेणार आहे. ही व्याख्यानमाला माेफत असून जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करतानाच स्वामी स्वरूपानंद सरस्वती पुढे म्हणाले, ”गेल्या चार दशकांपासून अध्यात्मशास्त्राचा प्रचार व प्रसार केला जात आहे. वेदांच्यामधील अव्दैत तत्वज्ञान हे जगातील सनातन आणि सर्वाेच्च तत्वज्ञान आहे. याच तत्वज्ञानाच्या आधारे प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील नैराश्य, ताणतणाव, अनेक दुःखे यांचा निरास हाेऊ शकताे. मनुष्याचे जीवन सुखी व सुसह्य हाेऊ शकते. हे अत्यंत उच्च तत्वज्ञान जगातील सर्व तत्वज्ञानांचाच नव्हे तर धर्मांचा आणि पंथांचा देखील गाभा आहे. हे ज्ञान विज्ञाननिष्ठ लाेकांना विज्ञानाच्या भाषेमध्ये व सर्वसामान्यांना त्यांच्या भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याचे मुख्य काम श्रुतिसागर आश्रमाच्या वतीने निरंतर केले जाते. त्याचबराेबर सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेवून आश्रमाच्या वतीने शैक्षणिक, वैद्यकीय आणि समाजाेपयाेगी कार्य करण्यात येत असल्याचेही स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले”.








