संजय गांधी निराधार योजनेचा चिंचवड मतदारसंघात सुमारे ७५०० जणांना लाभ – आमदार शंकर जगताप


शासन आपल्या दारी कार्यक्रमाद्वारे २०५ लाभार्थींना पेन्शनपत्रांचे वाटप



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालय, मुळशी तहसील कार्यालय आणि संजय गांधी निराधार योजना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते आज (गुरुवारी) २०५ लाभार्थींना मंजूर पेन्शन पत्रांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला तहसीलदार जयनाथ देशमुख, नायब तहसीलदार विशाखा काकडे, अन्नपुरवठा अधिकारी विजयकुमार क्षीरसागर, मंडलाधिकारी बाबासाहेब साळुंखे, राजेंद्र जाधव, भीमाशंकर बनसोडे, वैभव भुतेकर, तलाठी सुरेखा लांडे, कविता पाठक, सुरेश बोरकर, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सागर आंगोळकर, युवा नेते तानाजी बारणे, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते.
एकूण ७५०० हून अधिक लाभार्थ्यांना पेन्शन पत्र
आमदार शंकर जगताप यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, “आजवर चिंचवड विधानसभा क्षेत्रातील ७५०० हून अधिक लाभार्थींना पेन्शन पत्र वाटप करण्यात आले आहे. भविष्यात आणखी नागरिकांना याचा लाभ मिळावा यासाठी शासनाच्या योजना सोयीस्कर व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.”
चिंचवड विधानसभेतील प्रत्येक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संजय गांधी निराधार योजनेचे संयोजक नरेंद्र माने, गोपाळ माळेकर, सदस्य आदितीताई निकम, दिलीप गडदे, संजय मराठे, राजेंद्र पाटील यांचे त्यांनी विशेष आभार मानले.
कार्यक्रमाने लाभार्थींच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला असून, या योजनेच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना दिलासा मिळाला आहे.








