आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद दौऱ्याला लोणावळा शहरांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद


प्रभाग निहाय दौरा करत नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या



लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा शहरांमधून सुरू केलेल्या जनसंवाद दौऱ्याला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. प्रभाग निहाय आमदार सुनील शेळके व त्यांचे कार्यकर्ते नागरिकांच्या घरापर्यंत जात त्यांच्या समस्या समजावून घेत त्यांची लेखी निवेदने प्राप्त करून घेत आहेत. त्याप्रमाणे तात्काळ लोणावळा नगरपरिषद प्रशासन, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कामाबाबतचे निर्देश दिले जात आहेत.
मावळ तालुक्यामध्ये आमदार सुनील शेळके यांनी जनसंवाद दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात विधानसभेला सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या लोणावळा शहरापासून आज करण्यात आली आहे. वलवन गावातून या दौऱ्याला सुरुवात झाली. महादेव मंदिरासमोर नागरिकांच्या समस्यांची लेखी निवेदने स्वीकारल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी वलवन गाव, समता नगर, वलवन तलाव या परिसराची पाहणी करत त्या त्या ठिकाणचे अंतर्गत रस्ते, गटारी, नाले, व्यायाम शाळा व नागरिकांच्या इतर समस्यांबाबत प्रशासनाला निर्देश देत विहित कालावधीमध्ये ही कामे पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच या कामांसाठी लागणारा निधी हा देखील देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.
नांगरगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नागरिकांचा सत्कार व समस्यांची लेखी निवेदने आमदार सुनील शेळके यांनी स्वीकारली. नांगरगाव भागामधून आमदार सुनील शेळके यांना मोठे मताधिक्य मिळाल्याने या भागातील विकास कामांना लागणारा जो काही निधी असेल तो देण्याची आश्वासन त्यांनी दिले. तरुणांसाठी या ठिकाणी व्यायामशाळा बांधण्याबाबत तात्काळ नगर परिषदेने कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या तसेच नांगरगाव भागातील अंतर्गत गटारी, रस्ते भांगरवाडी नांगरगाव रेल्वे उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपुलाच्या खालून येणारा मोठा नाला हा नदीपर्यंत आरसीसी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. रेल्वे उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करण्याबाबतच्या सूचना ठेकेदार व लोणावळा नगरपरिषद प्रशासन यांना दिल्या आहेत. या कामांमध्ये येणारे अडथळे पुढील महिनाभरामध्ये सोडवण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येत्या आठ दिवसात बैठक लावत कामाला गती देणार असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
जिजामाता नगर, कालेकर मळा, राव कॉलनी या भागातील नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी तात्काळ निर्देश दिले आहेत. डेनकर कॉलनी या ठिकाणी एका बांधकाम व्यवसायकाने नैसर्गिक नाक्यावर स्लॅब टाकत नाला अरुंद केला आहे. त्यामुळे या भागात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्याबाबत लोणावळा नगरपरिषदेत तात्काळ कारवाई करत नाला पूर्वत खुला करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आमदार सुनील शेळके यांच्या या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा भरभरून असा प्रतिसाद लाभत आहे. निवडणूक काळामध्ये ज्याप्रमाणे नागरिक आमदार सुनील शेळके यांची वाट पाहत तासंतास थांबत होते. त्याच पद्धतीने या जनसंवाद यात्रेमध्ये आमदार सुनील शेळके यांना भेटून आपल्या समस्या मांडण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत आहेत. आमदार सुनील शेळके देखील प्रत्येक नागरिकाची समस्या समजावून त्याची लेखी निवेदने घेत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने काम करत लोणावळा शहरांमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.








