३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस सज्ज शहरात ठिकठिकाणी राहणार मोठा बंदोबस्त


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व्यापक बंदोबस्ताची योजना आखली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर रात्रीपासून १ जानेवारी २०२५ पर्यंत पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरभर तैनात असणार आहे.



नववर्षानिमित्त धार्मिक स्थळे, मंदिरे, मशिदी, मॉल्स, हॉटेल्स, लॉजेस आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त घालण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी पॉईंट्सवर वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करून वाहन चालवणारे, भरधाव वाहन चालवणारे आणि सार्वजनिक ठिकाणी अराजकता माजवणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल.

नववर्ष साजरी करताना मर्यादा ओलांडणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. अशा उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिला आहे.
वाहनांवरून अनधिकृतपणे कर्कश आवाज निर्माण करणारे किंवा ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई होणार आहे. याशिवाय, नववर्ष स्वागताच्या उत्साहात गोंगाट किंवा सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
संपूर्ण शहरात पोलिस आयुक्त १, सहायक पोलिस आयुक्त ६, पोलिस निरीक्षक ४६, सहायक निरीक्षक / उपनिरीक्षक १५४, पोलिस अंमलदार १५२०, क्यूआरटी पथक १, एसआरपीएफ पथक ५, स्टायकिंग ८ आणि वॉर्डन ७० यांची नियुक्ती करण्यात आली आहे.








