पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या शास्त्रीय संगीताने चिंचवडकर रसिकांची मनःतृप्ती


मंत्रमुग्ध करणाऱ्या भजनसंगीतांनी संपूर्ण परिसर भक्तिमय



श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराना घराण्याचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या ‘अभंगरूपी’ स्वर्गीय गायनाने संपूर्ण चिंचवड परिसर भक्तीरंगात न्हाऊन निघाले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित संगीत रसिकांनी स्वरचिंब अनुभूती घेतली.
चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या ३६३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या भक्तिसंगीत आणि अभंगवाणी या शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त केशव विद्वांस, स्वप्नील देव, स्वानंद मोकाशी, सत्यजित मुंगी यांच्या हस्ते पंडित जयतीर्थ मेवुंडी आणि त्यांच्या सहकलाकारांचा सन्मान केला.
“जय जय रामकृष्ण हरी” या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर “तुज मागतो मी आता”, “रूप तुझे देवा दाखवा केशवा”, “इंद्रायणी काठी देवाची आळंदी”, “ज्ञानियांचा राजा गुरू महाराज”, “लंबोदर गिरीजानंदन देवा”, “देहभान पांडुरंग; पंचप्राण पांडुरंग”, “नमिला गणपती”, “बाजे रे मुरलिया बाजे”, “नामाचा गजर गरजे भीमातीर” या एकाहून एक सरस आणि अप्रतिम भक्तीगीतांनी भक्तीरसाचा अद्भुत आविष्कार श्रोत्यांना ऐकायला मिळाला.
यावेळी पंडित जयतीर्थ मेवुंडी यांनी गायलेल्या “राजस सुकुमार मदनाचा पुतळा” या रचनेतून पांडुरंगाच्या भेटीची उक्तटता सुरांमधून प्रकट केली. तर स्वरचित “परि विठ्ठल अपरंपार, न कळे अकार, उकार, मकार, करिती विचार, विठ्ठल तरीही अपरंपार” ही रचना सादर करताच रसिकांनी ठेका धरत उत्स्फूर्त दाद दिली. “ठुमक ठुमक पद झिनिक झिनिक” हा अनोख्या धाटणीचा अभंग आणि “भाग्यदा लक्ष्मी बारम्मा” या संत श्री पुरंदरदास यांच्या मेवुंड़ी यांनी सादर केलेल्या रचनेने स्वरमंदिरावर कळस चढवला.
दरम्यान, या कार्यक्रमात पंडित जयतीर्थ मेवुंडी यांना पांडुरंग पवार यांनी तबल्याची, मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनियम, तालवाद्य अपूर्व द्रविड तर शुभम उगले यांनी पखवाजची साथसंगत दिली.








