देशासाठी स्वतंत्र राज्यघटना आणि लोकशाहीचा विचार मांडणारे लोकमान्य टिळक हे पहिले दूरदर्शी नेतृत्व – अविनाश धर्माधिकारी


श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन



चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लोकमान्य टिळकांना नेहमीच त्यांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या आडनावावरून लक्ष्य करण्याचे काम तत्कालीन इंग्रज सरकार आणि विरोधकांनी केले. टिळक म्हणजे ब्राम्हणी वर्चस्ववादी विचारांचे नेतृत्व असा अपप्रचार त्यांच्याबद्दल केला गेला. मात्र या देशासाठी एक स्वतंत्र जबाबदार सरकार असावे व त्याची निवड ‘एक व्यक्ती, एक मत’ या प्रक्रियेतून व्हावी, असा विचार त्यांनी सर्वप्रथम मांडला. यामध्ये कुठेही जातीभेद न करता सर्वांना समान हक्क असावा. व त्यासाठी देशाला स्वतंत्र राज्यघटना व लोकशाही असावी अशी भूमिका मांडणारे देशातील पहिले नेतृत्व लोकमान्य टिळक हे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

चिंचवड येथील श्रीमन महासाधु श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या ४६३व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ‘टिळक पर्व’ या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस व देवराज डहाळे यांच्या हस्ते धर्माधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना धर्माधिकारी म्हणाले की, ब्रिटिशांनी आपल्या देशाला फक्त राजकीय गुलाम बनवले नाही तर त्यांनी थेट आपल्या भारतीय संस्कृतीवर आक्रमण केले होते. भारतीयांनी स्वतःचा देव, देश, धर्म, तत्वज्ञान सोडून पाश्चात्य संस्कृती स्वीकारावी अशी मानसिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या राजकीय सत्ता आणि तथाकथित पाश्चात्य संस्कृतीविरोधात सह्याद्रीच्या कडेसारखे उभे राहून भारतीय संस्कृतीचे विकृतीकरण करण्याचे त्यांचे मनसुबे उधळून लावण्याचे काम लोकमान्य टिळकांनी त्यावेळी केले. मात्र इंग्रजांनी १९४७ ला भारताला राजकीय स्वातंत्र्य तर दिले मात्र स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही भारतीय संस्कृतीवर त्यांचे आक्रमण सुरूच आहे, हे आपल्या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
ते पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळक हे तळागाळातील दीनदुबळ्यासाठी, तेली-तांबोळ्यासाठी, बारा बलुतेदारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी लढणारे नेतृत्व होते. ज्यावेळी अब्रुनुकसानीच्या एका खटल्यात टिळकांना १०० दिवसांच्या कारावासाची शिक्षा इंग्रज सरकारने सुनावली त्यावेळी देशातील कामगारांचा पहिला संप हा टिळकांच्या सुटकेसाठी पुकारण्यात आला होता. आणि त्याचे नेतृत्व सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते आणि कामगार नेते नारायण मेघाजी लोखान्दे यांनी केले होते, हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
१८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी रँड या इंग्रज अधिकाऱ्याने प्लेगपीडित रुग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली, अत्याचारांनी हैदोस घातला. त्यामुळे समाजात इंग्रजांविरोधात असंतोष पसरू लागला. आणि या अत्याचाराविरोधात आवाज उठविण्याचे काम लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रातील अग्रलेखाद्वारे केले. त्यापासून प्रेरणा घेत चिंचवडच्या क्रांतिकारक चापेकर बंधूंनी या जुलमी रँडचा वध केला. म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हंटले जात होते. त्यामुळेच ज्यादिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याचदिवशी देशातील इंग्रजांनी इंग्लडच्या राज्यकर्त्यांना तातडीची तार करून कळविले की ‘नंबर वन इज नो मोअर’. मात्र जोपर्यंत आपण आहोत आणि जोपर्यंत हा भारत देश आहे तोपर्यंत लोकमान्य टिळक हे नेहमीच नंबर वन असतील, अशी भावना धर्माधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली.








