चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

पाककौशल्यात विद्यार्थिंनींइतकेच विद्यार्थीही सरस

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालय, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत विद्यार्थिंनीबरोबर विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभागी होत पाककौशल्यात आपणही सरस असल्याचे सिद्ध केले. क्रीडा स्पर्धांतर्गत शेवटच्या दिवशी पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचे वेगवेगळे दहा गट यामध्ये सहभागी झाले होते. तीन दगडांची चूल मांडून, शिधा आणि पूरक साहित्य सोबत घेऊन खिचडी, पुलाव, पराठे, भजी, पोळीभाजी या नेहमीच्या जेवणातील पदार्थांसोबतच मिष्टान्न तयार करून आपण भावी काळातील सुगरणी आणि बल्लवाचार्य असल्याचे सहभागींनी सिद्ध केले.
याबाबत अधिक माहिती देताना मुख्याध्यापिका वर्षा जाधव म्हणाल्या की, “स्त्री – पुरुष समानतेच्या आजच्या काळात स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अर्थार्जनासाठी घराबाहेर पडते. त्यामुळे स्वयंपाक ही फक्त स्त्रीची जबाबदारी न राहता पुरुषांनीदेखील त्यात पारंगत व्हावे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी १९९५ पासून सुमारे २९ वर्षे ही स्पर्धा विद्यालयात घेण्यात येते. स्पर्धेतील विजेत्यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विविध बक्षिसे प्रदान करून सन्मानित करण्यात येते!”
सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल करंबळकर आणि पोलीस अंमलदार देवेंद्र ढवळे यांनी परीक्षण केले. राजश्री पाटील, सुलभा झेंडे, शुभांगी बडवे, दीपाली शिंदे या वर्गशिक्षिकांसह विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी
संयोजनात सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button