ताज्या घडामोडीपिंपरी
गझल मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कशिश प्रस्तुत “गझल संध्या – चुपके चुपके” या हिंदी – मराठी गझलांच्या सुरेल मैफलीने निगडी प्राधिकरणातील आय. आय. सी. एम. आर. ऑडिटोरियममधील गझलप्रेमी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पं. किरण परळीकर, शर्मिला शिंदे आणि प्रतीक म्हाळस्कर यांच्या स्वरातील काही लोकप्रिय तर काही नव्या ताज्या गझलांचा उपस्थित रसिकांनी रसास्वाद घेतला.
मूळ फारसी काव्यप्रकार असलेली गझल ही लिखित विधा गायनाच्या माध्यमातून जेव्हा रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचून उत्स्फूर्त दाद मिळवते तेव्हाच ती पूर्णत्वाला जाते, असे म्हटले जाते. याचा पुरेपूर प्रत्यय या मैफलीत आला. मैफलीची सुरुवात उर्दू आणि मराठी शायरीचे दीपस्तंभ असलेल्या गालिब आणि सुरेश भट यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर नव्या दमाचे तरुण संगीतकार – गायक प्रतीक म्हाळस्कर यांनी “आहिस्ता-आहिस्ता” ही लोकप्रिय गझल आपल्या मखमली आवाजात सादर करून रसिकांची मने जिंकली. नंतर तरुण गझलकार अभिजित काळे यांनी लिहिलेल्या आणि स्वतः प्रतीक म्हाळस्कर यांनी स्वरबद्ध केलेल्या “तुला पाहून सुचल्या दोन ओळी” ही गझल सादर केली. या गझललाही रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. यांसह प्रतीक म्हाळस्कर यांनी सागर पाटील लिखित “तेरी बुझती हुई यादों को हवा ना लगे” आणि जौन ईलिया लिखित “उम्र गुजरेगी इम्तेहान में क्या” या दोन स्वतः संगीतबद्ध केलेल्या, तसेच “चुपके चुपके” आणि “नीयत – ए – शौक भर ना जाए कहीं”, या लोकप्रिय गझला सादर करून श्रोत्यांना आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. शर्मिला शिंदे यांनी सादर केलेली “रस्म – ए – उल्फत” ही फिल्मी गजल ऐकताना रसिकांना लता मंगेशकर – मदन मोहन या अजरामर जोडीची आठवण झाली नसेल तरच नवल. याचबरोबर “सलोना सा सजन”, तसेच पं. किरण परळीकर यांनी लिहिलेली आणि स्वरबद्ध केलेली “फुल मी, सुगंध तुजला”, या गझला अतिशय तयारीने सादर केल्या. मैफलीच्या उत्तरार्धात पं. किरण परळीकर यांनी तरुण गझलकार दिनेश भोसले लिखित “तू हासतेस तेव्हा” आणि सागर पाटील लिखित “आधार आज द्यावा माझ्याच आसवांनी” या त्यांनी स्वतः स्वरबद्ध केलेल्या गझला सादर केल्या. पंडितजींच्या स्वरांनी रसिक भारावले असतानाच कार्यक्रमाची शेवटची गजल – “वफा के शम्मे बुझाओ” – सादर करण्याआधी पंडितजींनी प्रेक्षागृहातील सर्व दिवे बंद करण्यास सांगितले आणि केवळ एका मेणबत्तीच्या प्रकाशात ही गझल सादर झाली. अशा रीतीने अतिशय भारावलेल्या वातावरणात मैफलीची सांगता झाली.
मैफलीतील प्रचलित आणि अप्रचलित उर्दू, हिंदी, मराठी गझलांची निवड ही मुळातच वैविध्यपूर्ण भावनांचा परिपोष करणारी होती. ताना, मुरक्या, पलटे अथवा गायकीतील चमत्कृतींच्या आहारी न जाता स्वच्छ अन् स्पष्ट शब्दोच्चार आणि तरीही सुरेलता सांभाळून तीनही गायकांनी सर्व गझलरचना परिणामकारकरीत्या सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. नीलेश शिंदे यांची तबला आणि प्रतीक म्हाळस्कर यांची संवादिनी साथ दुधात मिसळून गेलेल्या साखरेइतकीच मधुर होती. त्यांच्या जोडीला डॉ. सतीश गोरे यांनी गिटारवर तसेच राजेश डेव्हिड यांनी कीबोर्डवर उत्तम साथ केली. स्वतः पंडित किरण परळीकर यांनी निवेदनाची धुरा उत्तमरीत्या सांभाळली.
गझल या विधेचा प्रचार अन् प्रसार करण्यासाठी वेळोवेळी पदरमोड करून कशिश या संस्थेने केलेल्या
प्रामाणिक प्रयत्नांना रसिकांसह अनेक मान्यवरांनी हातभार लावले.








