ताज्या घडामोडीपिंपरी

वायसीएम रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना रात्रनिवारा केंद्र अल्प दरात उपलब्ध करून देण्याच्या विषयास स्थायी समितीची मान्यता

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना रात्रनिवारा केंद्र अल्प दरात उपलब्ध करून देण्याच्या विषयांसह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता  आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य  प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहामध्ये  पार पडलेल्या या  बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे,  चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पिंपरी चिंचवड शहरातील तसेच लगतच्या ग्रामीण भागातून तसेच पुणे जिल्ह्याबाहेरील देखील रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी दीर्घकाळ दाखल होत असतात. शहराबाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून रुग्णांच्या  नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने  रात्रनिवारा केंद्र उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रुग्णालयासमोरील आवारात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ११ मजली इमारतीच्या तळमजल्यावर फिजिओथेरपीच्या विभागालगतच्या जागेत रुग्णांच्या नातेवाईकांकरिता ही व्यवस्था करण्यात येणार आहे.  या ठिकाणी नातेवाईकांनी स्वतः विश्रांती घेऊन त्यांच्या रुग्णांची देखभाल अथवा सुश्रुषा करणे अभिप्रेत आहे. रात्र निवारा केंद्रामध्ये पुरुषांसाठी ३५ बेड्स व महिलांसाठी २५ बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार बेडच्या संख्येत बदल होऊ शकतो. महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी ५ स्वच्छतागृहे ५ स्नानगृहांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

ज्या गरजू तसेच आर्थिक दुर्बल नातेवाईकांना रात्र निवाऱ्याची आवश्यकता असल्यास त्यांना अत्यंत अल्प दरात रात्र निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रात्र निवारा करिता प्रवेशाचे नियम व अटी :

 

  • या निवारा केंद्र प्रवेशासाठी अर्जदाराचा रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील आंतर रुग्ण विभागामध्ये दाखल असणे आवश्यक आहे.
  • कक्ष प्रवेशासाठी प्रवेश अर्ज भरणे व एमएसडब्ल्यू यांच्याकडून   मंजूर करून घेणे आवश्यक आहे.
  • निवारा केंद्रामध्ये धूम्रपान मद्यपान तसेच अंमली पदार्थांवर बंदी असेल ते करताना आढळल्यास संबधितांवर दंड आकारून तसेच निवारा केंद्राचा प्रवेश रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • निवारा केंद्राचे शुल्क दररोज दुपारी बारा वाजेपर्यंत भरणे आवश्यक आहे व त्याची पावती एमएसडब्ल्यू यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. अन्यथा तो  बेड इतर नातेवाईकास दिला जाईल.
  • अर्जदार महिलांसोबत बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश देण्यात येईल.
  • रात्र निवारा कक्षामध्ये बाह्य खाद्यपदार्थ खाण्यास व बनविण्यास परवानगी नाही.
  • पुरुषांना स्त्रियांच्या कक्षामध्ये व स्त्रियांना पुरुषांच्या कक्षामध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे.  या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास संबंधितांवर पोलीस कारवाई करण्यात येईल.
  •  रुग्णांच्या नातेवाईकांच्या  सर्व वस्तूंची जबाबदारी त्यांची वैयक्तिक राहील. त्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची नातेवाईकांनी नोंद घ्यावी.
  • निवारा केंद्रात शांतता बाळगून नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
  • निवारा केंद्रात स्वच्छता राखणे बंधनकारक असेल.
  •  आंतर रुग्ण विभागात दाखल असलेल्या नातेवाईकांपैकी एकाच व्यक्तीला रात्र     निवा-याचा  लाभ मिळेल.
  • रात्र निवाऱ्यामध्ये फक्त बेडची सुविधा उपलब्ध असेल. त्यावरील पांघरून आणण्याची जबाबदारी संबंधित नातेवाईकांची राहील.
  • राहण्याकरता शुल्क भरून पावती तयार झाल्यास कोणत्याही कारणास्तव ती रद्द केली जाणार नाही तसेच  त्याची रक्कम परत अदा करता येणार नाही.

प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत तरतूद वर्गीकरण, तरतूद वाढ घट, मुदतवाढ, कार्योत्तर मान्यता आदी विषयांना देखील मान्यता दिली.

                                                                            

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button