पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची महापालिकेच्या विविध प्रकल्पांस भेट


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दूरदृष्टीकोनातून शहरवासियांच्या सोयीसाठी दिव्यांग भवन,वेस्ट टू एनर्जी यासारखे सुरू केलेले अनेकविध स्तुत्य उपक्रम आणि प्रकल्प अनुकरणीय आहेत असे मत पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी व्यक्त केले.



पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्प, उपक्रम आदी ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी भेट दिली, यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या बोलत होत्या.

महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या नव्या प्रशासकीय इमारतीच्ची आढावा बैठक महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या बैठकीत देखील श्रीमती आव्हाळे यांनी सहभाग घेऊन इमारतीची रचना जाणून घेतली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता मनोज सेठिया, विजय काळे, उप आयुक्त विठ्ठल जोशी,अविनाश शिंदे, नीलेश भदाने, मनोज लोणकर,संदीप खोत,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती आव्हाळे यांनी मोशी येथील वेस्ट टू एनर्जी, हॉटेल वेस्ट टू बायोगॅस प्रकल्प, बांधकाम राडारोडा प्रक्रिया केंद्र, तसेच याठिकाणी असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना भेट देऊन तेथील माहिती घेतली. यावेळी महानगरपालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी व कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.
नव्याने उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवनाला देखील आव्हाळे यांनी भेट दिली. यावेळी समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, द भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी दिव्यांग भवनाची तसेच तेथील उपक्रमांची माहिती दिली. निगडी येथील आय.सी.सी.सी.या महापालिकेच्या प्रकल्पासही आव्हाळे यांनी भेट दिली. स्मार्ट सिटीचे किरणराज यादव, लेखाधिकारी सुनील भोसले, माहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, काँप्युटर प्रोग्रामर संजय जाधव यांनी प्रणालीची माहिती दिली.








