ताज्या घडामोडीपिंपरी

“मानवतावाद हाच सर्वोच्च धर्म!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  “मानवतावाद हाच सर्वोच्च धर्म हे ब्रीद आचरणात आणून पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार या गावाला आशिया खंडाच्या नकाशावर अग्रस्थानी आणले!” असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी यशवंतराव चव्हाण ट्रेनिंग सेंटर, आदर्शगाव हिवरेबाजार, जिल्हा अहिल्यानगर येथे व्यक्त केले.
पिंपरी येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच कृषिभूषण सुदाम भोरे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वार्षिक शब्दोत्सवाच्या सातव्या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक सुरेशचंद्र वारघडे (लोकशिक्षक बाबा भारती स्नेहबंध पुरस्कार), बौद्धाचार्य आणि निवेदक सचिन कांबळे (लोकशिक्षक बाबा भारती पाली भाषा पुरस्कार), कविवर्य भरत दौंडकर  (लोकशिक्षक बाबा भारती काव्यसाधना पुरस्कार), चित्रपटनिर्माते, कवी दत्तात्रय जगताप आणि रानकवी जगदीप वनशिव (लोकशिक्षक बाबा भारती काव्यप्रतिभा पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना पोपटराव पवार म्हणाले की, “शिकून, संघटित होऊन आणि आपले हक्क मिळवून आनंदित जीवन जगा, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण होती. धरणांची ब्लू प्रिंट सर्वात पहिल्यांदा बाबासाहेबांनी केली अन् आपल्याला समृद्धीचा मार्ग दाखविला. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मान्यवरांचे विचार आमच्या गावातील विद्यार्थी आणि पालक यांना ऐकण्याची सुसंधी लाभली!” सुरेशचंद्र वारघडे यांनी, “दलाई लामा यांची भेट पोपटराव यांच्यासाठी प्रेरणादायी ठरली. विज्ञान, अध्यात्म अन् धर्म यांचा समन्वय हिवरेबाजार येथे साधला गेला आहे!” असे मत व्यक्त केले. मुख्य संयोजक पुरुषोत्तम सदाफुले यांनी अन्य सन्मानार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. सचिन कांबळे यांनी बाबा भारती यांचे कार्य इस्लामपूर परिसरातल्या तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत असल्याची माहिती दिली; तर भरत दौंडकर (“बैलावानी राबणारा बाप गायीवानी होता…”), दत्तात्रय जगताप (“बाप अडाणी बखळ…”) आणि जगदीप वनशिव (“जगत जा, बघत जा…”) यांनी अशा भावोत्कट कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. सुदाम भोरे यांनी, “आदर्शगाव हिवरेबाजार म्हणजे पोपटराव पवार आणि पोपटराव पवार म्हणजे हिवरेबाजार, या समीकरणाने मलादेखील कृतिशील  बनवले आहे!” असे सांगितले.
प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “बुद्धाप्रमाणे पोपटराव यांनी गावातील दुःखाची मुळं शोधून काढली; आणि हिवरेबाजार  दुःखमुक्ती अन् व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागले.  धर्म, राजकारण, समाजकारण यांमध्ये सकारात्मक, विधायक आणि संतुलित भूमिका स्वीकारून ते कार्यरत आहेत!” अध्यक्षीय मनोगतातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, “सूर्यासारखी प्रतिभा असणार्‍यांचा वैभवशाली देश असा लौकिक ऐकून कोलंबस भारताच्या शोधत निघाला होता. पोपटराव हे आजच्या काळातील कोलंबस आहेत.
समाजकारणात त्यांच्या कार्यापासून मला प्रेरणा मिळत असते!” असे विचार मांडले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन,  वृक्षपूजन आणि धम्मवंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कवी सतीश मोघे यांच्या बाबासाहेबांना अभिवादन करणार्‍या कवितेचे ध्वनिमुद्रण ऐकवण्यात आले. मान्यवर, प्रातिनिधिक विद्यार्थी तसेच ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांना संविधानातील उद्देशिकेची प्रतिमा आणि ‘बुद्धायन’ या ग्रंथाच्या प्रती प्रदान करून सन्मानित करण्यात आले. जयश्री श्रीखंडे यांनी मानपत्राचे वाचन केले. महेंद्र भारती यांनी प्रास्ताविकातून, “डॉ. आंबेडकर, राहुल सांस्कृत्यायन, आचार्य  जावडेकर अशा दिग्गजांकडून बाबा भारती यांनी लेखनाची प्रेरणा घेऊन सुमारे पंचवीस ग्रंथांचे लेखन केले होते!” अशी माहिती दिली. अरुण गराडे, प्रभाकर वाघोले, मनीषा उगले, प्रकाश कांबळे, प्रा. प्रभाकर दाभाडे, सविता इंगळे, ललिता सबनीस, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. बाजीराव सातपुते यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button