पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भारतीय जनता पक्षात विविध संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, सक्रिय युवा कार्यकर्ते आदित्य कुलकर्णी यांची भाजप युवा मोर्चा उद्योग आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पार पडली.
यमुनानगर, निगडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दीर्घकाळ संघटनात्मक काम केलेल्या कुलकर्णी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी मजबूत संपर्क निर्माण केला आहे. शाखास्तरापासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या या अनुभवाचा आणि युवकांमधील प्रभावाचा विचार करून पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर आदित्य कुलकर्णी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत शहरातील युवा उद्योजकांना एकत्रित करून शासनाच्या उद्योगविषयक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
या नियुक्तीचे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून स्वागत होत असून, कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा उद्योग आघाडीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

