पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, उमेदवार अनिता संदीप काटे यांच्या प्रचारासाठी संदीप काटे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. घराघरांत जाऊन, गल्लोगल्ली भेटी देत त्यांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि नाराजी ऐकून घेतली.
या जनसंवाद मोहिमेत पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक कोंडी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, तसेच परिसरातील मूलभूत सुविधांचा अभाव हे मुद्दे नागरिकांनी ठळकपणे मांडले. संदीप काटे यांनी या सर्व प्रश्नांची नोंद घेत, “निवडून आल्यानंतर केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करून दाखवले जाईल,” असा विश्वास नागरिकांना दिला.
अनिता संदीप काटे या स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यातून परिचित असल्याने त्यांच्या उमेदवारीकडे नागरिक आशेने पाहत आहेत. संदीप काटे यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रचाराला अधिक धार मिळाल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे. ‘थेट संवाद, थेट कृती’ हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठेवत, त्यांनी कोणताही दिखावा न करता नागरिकांशी साधेपणाने संवाद साधला.
या भेटीदरम्यान अनेक नागरिकांनी विकासकामांतील रखडपट्टी, प्रभागातील दुर्लक्ष आणि निवडून आल्यानंतर संपर्कात न राहणाऱ्या लोकप्रतिनिधींविषयी नाराजी व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना संदीप काटे म्हणाले की, “लोकप्रतिनिधी हा नागरिकांपासून दूर नसून त्यांच्या प्रश्नांसाठी सदैव उपलब्ध असला पाहिजे. हाच विचार घेऊन अनिता काटे या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.”
प्रभाग २८ मध्ये सध्या प्रचाराची रंगत वाढत असून, संदीप काटे यांच्या या थेट जनसंवादामुळे अनिता संदीप काटे यांच्या प्रचाराला बळ मिळत असल्याचे चित्र आहे. आगामी काळात या संवादाचे मतदानावर किती परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
