पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचाराला गती देत प्रभाग क्रमांक २८ (रहाटणी–पिंपळे सौदागर) येथून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले. आज दि. २९ डिसेंबर रोजी विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासह मीनाक्षीताई अनिल काटे, सायलीताई उमेश काटे आणि शितालताई नाना काटे यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले.
अर्ज दाखल करताना परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने एकत्र येत एकसंघ ताकदीचे दर्शन घडवले. विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.
प्रभाग २८ मध्ये पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक व नागरी सुविधा या मुद्द्यांवर भर देत सर्वसमावेशक विकासाचा अजेंडा राबवला जाईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रभागात भक्कमपणे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमातून स्पष्ट झाले.
