उन्नती सोशल फाउंडेशनचा आगळावेगळा उपक्रम : मिरवणुकीविना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवणारी उन्नती सोशल फाउंडेशन व उन्नती सखी मंच यांनी यंदाही गणेशोत्सव विसर्जनाचा उपक्रम पर्यावरणपूरक व अभिनव पद्धतीने पार पाडला.
गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असला तरी विसर्जनाच्या वेळी होणारी वाहतूककोंडी, ध्वनीप्रदूषण व नागरिकांना होणारा त्रास ही गंभीर समस्या आहे. याची जाणीव ठेवून उन्नती सखी मंच यांनी गेल्या ०४ वर्षांपासून मिरवणुकीविना, कृत्रिम हौदामध्येच मंडपाजवळ गणेश विसर्जन करण्याची परंपरा सुरु केली आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होत नाही, वेळेची बचत होते तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करता येते. हा अभिनव प्रयोग समाजात एक आदर्श ठरत असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.उन्नती सोशल फाउंडेशनचा हा उपक्रम पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी निश्चितच समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे.
याबाबत उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदा संजय भिसे यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा श्रद्धा व संस्कृतीचा उत्सव आहे. मात्र त्याचबरोबर पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवणे हे आजच्या काळाची गरज आहे. उन्नती सोशल फाउंडेशन व उन्नती सखी मंच यांची ही वाटचाल समाजासाठी एक सकारात्मक संदेश देणारी ठरावी, हीच अपेक्षा आहे.”
याप्रसंगी , उन्नती सोशल फाउंडेशन चे संस्थापक संजय तात्याबा भिसे ,यांच्यासह विठाई वाचनालय चे सभासद , आनंद हास्य क्लब चे सभासद , ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशन चे सर्व सभासद तरुण वर्ग आणि पिंपळे सौदागर मधील गणेशभक्त आदी उपस्थित होते.














