‘लाडकी बहीण’ हि ‘सुरक्षित बहीण’ झाली पाहिजे – तुषार कामठे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड पोलीस स्टेशन येथे भारतीय जनता पक्षाच्या युवती प्रदेश सचिव व महिला पदाधिकाऱ्यांवर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष यांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाचा, तसेच डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण आणि नुकतीच घडलेली नकुल भोईर हत्या या तीन गंभीर घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी तर्फे गुरुवार, दि.३० नोव्हेंबर २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
या आंदोलनाद्वारे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णपणे ऱ्हास झाल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. महिलांवरील वाढते अत्याचार, सत्ताधारी पक्षातील अंतर्गत हिंसाचार आणि सामाजिक असुरक्षिततेची वाढती भावना या सर्व बाबींवर महाविकास आघाडीने तीव्र निषेध नोंदविला.
भाजप पक्षातील महिला पदाधिकारी स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेल्या असता त्यांनाच पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली ही घटना अत्यंत निंदनीय आहे. महिलांच्या सन्मानाचा भंग करणाऱ्या या प्रकारामुळे शासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे. तसेच डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने राज्यातील महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न आणखी गहिरा झाला आहे. दुसरीकडे नकुल भोईर यांच्या हत्येच्या घटनेने राज्यातील युवक वर्गात असंतोष निर्माण झाला असून, न्यायप्राप्तीची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
महाविकास आघाडी तर्फे या तिन्ही घटनांबाबत शासन व प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर, निष्पक्ष व वेगवान कारवाई करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहर, जिल्हा व विभागीय पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी, सेवादल, विविध सेल, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. “महिलांवरील अत्याचार थांबवा”.. “भाजप सरकार जागे व्हा”.. अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनाचे नेतृत्व पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले. आपले विचार मांडताना नमूद केले की, लाडकी बहीण हि सुरक्षित बहीण झाली पाहिजे, महिलांवरील व युवकांवरील अन्यायाचा काळ संपविण्यासाठी एकत्रित लोकशाही लढा गरजेचा आहे. शासनाची निष्क्रियता आणि कायदा-सुव्यवस्थेतील ढिलाईमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि त्यास तात्काळ आळा बसावा यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. धम्मराज साळवे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्रीमंत जगताप, सचिव योगेश सोनवणे, प्रवक्ता माधव पाटील, ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, अॅड. विजय बाबर, काँग्रेस पक्षाचे पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, युवक काँग्रेसचे प्रवक्ते गौरव चौधरी, सोमनाथ शेळके, मिलिंद फडतरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडी तर्फे या आंदोलनातून स्पष्ट संदेश देण्यात आला की, महिलांवरील अत्याचार, राजकीय हिंसा आणि सामाजिक असुरक्षितता याविरुद्धचा लढा न्याय मिळेपर्यंत सुरू राहील आणि शासनाने या घटनांकडे गांभीर्याने पाहून तातडीने ठोस निर्णय घ्यावेत.

















