आळंदीताज्या घडामोडीपिंपरी

आळंदीत भाविकांच्या सेवा सुविधांची कामे वेळेत पूर्ण करा – प्रांत अनिल दौन्डे   

आळंदी कार्तिकी यात्रा २०२५ बैठक 

Spread the love
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील कार्तिकी यात्रा २०२५ अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आळंदीत साजरा होत आहे. सोहळ्याचे काळात नागरिक, भाविक यांचे साठी पुणे जिल्हा प्रशासनांचे माध्यमातून विविध नागरी सेवा सुविधा देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या साठी सर्व शासकीय खात्यांचे माध्यमातून आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, दर्शन बारी व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आदी सेवा सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश खेडचे प्रांताधिकारी अनिल दौन्डे यांनी दिले.
     आळंदी नगरपरिषद सभागृहात आळंदी कार्तिकी यात्रा नियोजन पूर्व आढावा बैठक उपविभागीय अधिकारी, खेड अनिल दौन्डे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध शासकीय अधिकारी , कर्मचारी, पदाधिकारी यांचे नियोजन पूर्व आढावा घेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी सर्व अधिकारी, पदाधिकारी कर्मचारी यांचे स्वागत करीत कामांचा आढावा घेत मार्गदर्शन केले.
  या बैठकीस श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस निरीक्षक, दिघी-आळंदी वाहतूक शाखा, सहायक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग खेड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण चाकण, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा विभाग खेड, आगार प्रमुख राजगुरुनगर, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, डेपो मॅनेजर PMPML, कनिष्ठ अभियंता महावितरण आळंदी, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
  यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. १२ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या पूर्व तयारी साठी सर्व संबंधित विभागांना आपल्या विभागाशी निगडित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
  श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी तर्फे दरवर्षी पेक्षा या वर्षी १५ ते २० लाख भाविक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समन्वय राखून नियोजन करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
  पोलीस विभागा कडून १५० अधिकारी, ११०० अंमलदार, तसेच ६०० अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याचे सांगण्यात आले. दर्शनबारी परिसरात मंडप, वॉच टॉवर, माईक सिस्टीम, पीए सिस्टीम व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी नेहमी प्रमाणे करण्यात आली.
  ग्रामीण रुग्णालय आळंदी यांनी यात्रा काळात २४ तास सेवा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. ठेवण्याचे, ५  ICU बेड, १० वैद्यकीय पथके ( ऑक्सिजनसह ), १०८ व १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका, तसेच साथरोग नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी प्रशासनास सांगितले.
  महावितरण विभागाने विद्युत पुरवठा अखंड ठेवण्याचे व जुन्या तारांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व खड्डे बुजविण्याचे, तर पाटबंधारे विभागाने नदीत १५० क्युससेस क्षमतेने पाणी सोडण्यास सांगितले.
  आळंदी नगरपरिषदेच्या वतीने दर्शनबारी, सीसीटीव्ही, मंडप, वॉच टॉवर, अतिक्रमण निर्मूलन इत्यादी सर्व कामे १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
भाविकांसाठी जिल्हा परिषदे मार्फत १८०० व नगरपरिषदे मार्फत १००० मोबाईल टॉयलेट्स बसविण्यात येणार आहेत. तसेच शहरात सुरळीत पाणी पुरवठा, ५ फिलिंग पॉइंट्स, NDRF च्या २ टीम्स, अग्निशमन वाहने, भोजन व्यवस्था आणि अतिरिक्त विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. रथोत्सवाच्या काळात प्रदक्षिणा मार्गावर जनरेटरद्वारे विद्युत पुरवठा ठेवण्यात येणार आहे. या पुढील अंतिम आढावा बैठक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी खेडचे प्रांत अनिल दौन्डे यांचे पूर्व परवानगी घेऊन जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button