मिलिंदनगरमधील SRA प्रकल्प परिसरात पाऊसामुळे अस्वच्छतेचा कहर; युवा नेते सुहास कुदळे यांची सुरक्षेसाठी पत्र्याचे कपाउंड लावण्याची मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरीतील मिलिंदनगर परिसरात सुरु असलेल्या SRA प्रकल्पामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल, साचलेले पाणी आणि कचऱ्याचा विळखा पडला आहे. या परिस्थितीतून स्थानिकांना दिलासा मिळावा यासाठी युवा नेते सुहास कुदळे यांनी पालिकेकडे तातडीने सुरक्षेची मागणी केली आहे.
कुदळे यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, प्रकल्प स्थळी पावसामुळे खड्डे भरले गेले असून, या ठिकाणी लहान मुले खेळतात. अशा ठिकाणी जर एखादा अपघात झाला, तर जबाबदारी कोणाची असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात सुरक्षेसाठी पत्र्यांचे कंपाउंड लावणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पाच्या सध्या सुरू असलेल्या कामांमुळे आरोग्याच्या समस्या उभ्या राहिल्या असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. नागरिकांच्या या समस्येकडे गांभीर्याने पाहून प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.













