Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आज मोठा उलथापालथीचा दिवस ठरत आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार व माजी नगरसेवक राहुल कलाटे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे, या पक्षप्रवेशाला भाजपमधील निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध असतानाही, स्थानिक नाराजीला न जुमानता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून पिंपरी-चिंचवड विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज या चर्चांवर शिक्कामोर्तब होत असून, राष्ट्रवादीसाठी ही राजकीय गळती चिंताजनक मानली जात आहे.

राहुल कलाटे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात थेट लढत दिली होती. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि महापालिकेतील माजी गटनेते अशी त्यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शरद पवार गटाकडून उमेदवारी घेतली होती. मात्र आता तेच कलाटे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य आणि खळबळ निर्माण झाली आहे.

या संभाव्य पक्षप्रवेशामुळे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली होती. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ऐनवेळी पक्षात आलेल्या ‘आयात’ नेत्यांना थेट उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने स्थानिक इच्छुक उमेदवार संतप्त झाले होते. विशेषतः प्रभाग क्रमांक 25 साठी राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, या चर्चेमुळे भाजपमधील नाराजी उफाळून आली.
“ज्या उमेदवाराने अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्याचाच प्रचार आम्ही कसा करायचा?” असा थेट सवाल नाराज कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या वरिष्ठांनी आमच्यावर अन्याय होऊ दिला नाही, तरच आम्ही शांत राहू; अन्यथा वेगळी भूमिका घेऊ, असा निर्वाणीचा इशाराही इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींना दिला होता.

एकीकडे भाजप पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षविस्ताराचा प्रयत्न करत असला, तरी दुसरीकडे आयात उमेदवारांमुळे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले जात असल्याची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. राहुल कलाटे यांच्या प्रवेशामुळे भाजपला तात्कालिक राजकीय फायदा होईल की अंतर्गत असंतोष वाढेल, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version