Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी सांगवीतील राजकारणाला मोठा वळण मिळाले आहे. प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी येथील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक  अंबरनाथ कांबळे व दिप्ती कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचार प्रमुख, माजी विरोधी पक्षनेते  विठ्ठल उर्फ नाना काटे तसेच माजी नगरसेवक राजेंद्र जगताप उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीत भर पडल्याचे मानले जात आहे.

नवी सांगवी परिसरात अंबरनाथ व दिप्ती कांबळे यांचा स्थानिक पातळीवर प्रभाव असून, त्यांच्या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपसाठी हा धक्का मानला जात असून, विशेषतः प्रभाग क्रमांक ३१ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
पक्षप्रवेशानंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विकासाभिमुख राजकारण, स्थानिक प्रश्नांचे प्रभावी निराकरण आणि संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रवेशामुळे नवी सांगवीतील राजकीय हालचालींना वेग आला असून, पुढील काळात आणखी पक्षांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share.
Leave A Reply

Exit mobile version