ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विशेष उपक्रमामुळे बालवाडीतील सहा हजारापेक्षा जास्त बालकांना झाला फायदा

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने विशेष मोहीम हाती घेत महापालिकेच्या सर्व २११ बालवाड्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या उपक्रमामुळे सहा हजारांहून अधिक बालकांना अधिक सुरक्षित, दर्जेदार, आकर्षक आणि शिकण्यासाठी अनुकूल वर्गखोल्या मिळाल्या असून त्याचा बालकांना खूपच फायदा होतोय.

बालवाडीतील बालकांसाठी गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेने पूर्व बाल्यावस्था काळजी आणि शिक्षण (ECCE) या रणनीतीवर आधारित विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे बालकाची साक्षरता, अंकज्ञान आणि विविध कौशल्यांमध्ये २० ते २४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या साध्या वर्गखोल्या आता खेळ आधारित शिक्षण, कथाकथन, प्रत्यक्ष अनुभव देणारे चैतन्यशील वातावरणासोबतच एकप्रकारे बाल केंद्रित ज्ञानकेंद्रांमध्ये रूपांतरित झाल्या आहेत.

शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील सकारात्मक संबंधांचा फायदा..
बालवाड्यामध्ये सुधारणा करण्यासाठी शिक्षक, पर्यवेक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आदींनी आपले योगदान दिले. संबंधितांनी अभ्यासक्रमाची पुनर्रचना करुन त्यामध्ये नियमित मासिक प्रशिक्षण, विशेष शिक्षण साहित्य आणि शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील सकारात्मक संबंधांमुळे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होण्यास मदत झाली. सध्या, १६ मास्टर ट्रेनर्स आणि ९ पर्यवेक्षक सर्व बालवाड्यांमध्ये सदर धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी योगदान देत आहेत.

मुलांसाठी सुरक्षित आणि पोषक वातावरण..
महापालिकांच्या सर्वच बालवाड्यांमध्ये राबविलेल्या धोरणामुळे लक्षणीय बदल झाले आहे. यामुळे आता बालवाडीतील मुले खेळाद्वारे इंग्रजी आणि विज्ञानाचे धडे गिरवत असून डॉक्टर आणि पोलीस अधिकारी मुलांशी संवाद साधत असून मुले खेळणी, ब्लॉक्स व सर्जनशील खेळांद्वारे कौशल्ये विकसित करीत आहेत. सदर उपक्रमामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सामाजिक-भावनिक शिक्षण आणि सुरक्षित स्पर्शाचे प्रशिक्षण दिल्यामुळे मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळत आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये..
२११ महापालिका बालवाड्यांमध्ये यशस्वी परिवर्तन
सहा हजारांपेक्षा जास्त बालकांना लाभ
पायाभूत कौशल्यांमध्ये २०-२४ टक्के सुधारणा
खेळ-आधारित, कौशल्य-केंद्रित अभ्यासक्रमाचा स्वीकार
पालक भागीदारी आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) चे यशस्वी एकत्रीकरण
वास्तविक जगाच्या अनुभवांसह आणि भावनिक सुरक्षिततेने समृद्ध वर्ग शिक्षण

‘आदर्श बालवाडी’ साठी शिक्षण विभाग घेणार पुढाकार..
शिक्षण विभागाने बालवाडींच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य आराखड्यानुसार विशेष हस्तपुस्तिका तयार केली असून त्याची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने दखल घेतली. याचबरोबर महापालिका चालू शैक्षणिक वर्षापासून २० बालवाडी ‘सीएसआर’ फंडातून व २० बालवाडी महापालिकेच्या पुढाकारातून आदर्श बालवाडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, पर्यवेक्षक, मुख्य समन्व्ययक यांच्याकडून कामकाजाचे परीक्षण करुन बालवाडीमधील एका शिक्षकास आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.

विशेष मुलांची ओळख निर्माण करण्यासाठी पुढाकार..
महापालिकेच्या शाळांमध्ये विविध प्रकारचे दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या कमतरतेवर मात करुन त्यांनाही गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे व त्यांना शिक्षण घेताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

बालपण हा प्रत्येक व्यक्तीच्या विकासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक मुलाला शिक्षणाची एक भक्कम आनंदी सुरुवात व्हावी, हेच आमचे ध्येय आहे. आमच्या बालवाड्यांमध्ये गुंतवणूक करून, शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देऊन, पालकांना या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेऊन आणि खेळ-आधारित शिक्षणाचा स्वीकार करून, आम्ही अधिक समावेशक आणि सुशिक्षित पिंपरी चिंचवडचा भक्कम पाया रचत आहोत.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

जेव्हा पालक व शिक्षण मुलांच्या हितासाठी एकत्र येतात, तेव्हा मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढते. आम्ही महापालिका म्हणून मुलांच्या विकासासाठी त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर गुणात्मक वृध्दीसाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये पोषण, थेट लाभ हस्तांतरणद्वारे शालेय साहित्य, मुलाच्या दैनंदिन शिक्षणातील सक्रिय सहभाग यासाठी आम्ही सदैव कटिबध्द असून विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ हेच आमचे महत्वाचे ध्येय आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

प्रत्येक महिन्याला होणाऱ्या क्लस्टरमुळे अभ्यासक्रमात व शिकविण्याच्या पद्धतीमध्ये एकसूत्रता दिसून येते आहे. शिक्षिका प्रत्येक महिन्याची थिम लक्षात घेऊन दररोज वर्गाचे नियोजन करताना दिसत आहेत, व प्रत्येक बालकापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवत आहेत.
– यमुना खंडागळे, सहाय्यक समन्वयिका, पूर्व प्राथमिक विभाग.

आमची प्रत्येक महिन्यात बालकांशी निगडित विषयावर पालकसभा बालवाडी शिक्षिकांडून घेतली जाते. ज्याचा फायदा आम्हाला व आमच्या बालकांना होतो. आम्हाला आमची बालके पालिकेच्या शाळेत सुरक्षित वाटतात. प्रत्येक गोष्टीत आम्ही सहभागी होतो.
– सोनाली पाटोळे, पालक- दापोडी मुली प्राथमिक शाळा ३१.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button