पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत ३२ प्रभागातून एकूण १२८ नगरसेवक चार सदस्यीय पद्धतीने निवडले जाणार आहेत.
महापालिकेची अंतिम प्रभागरचना सहा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यामध्ये सहा प्रभागांत बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे आरक्षणातही फेरबदल होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अध्यादेशानुसार आरक्षित जागांची संख्या निश्चित करून ४ नोव्हेंबरपर्यंत आयोगाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
सोडत प्रक्रिया पूर्ण करून ११ नोव्हेंबर रोजी निकाल आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे. त्यानंतर २४ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना प्रारूप आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना सादर करण्याची संधी दिली जाणार असून, १ डिसेंबरपर्यंत आयुक्तांकडून या हरकतींवर निर्णय घेतला जाईल. शेवटी, २ डिसेंबर रोजी आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.
यंदाच्या निवडणुकीत ‘एससी’साठी २०, ‘एसटी’साठी ३, ‘ओबीसी’साठी ३५ आणि खुल्या गटातील ३५ अशा एकूण जागांवर महिलांचे आरक्षण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागातील अ, ब, क, ड या जागांवर महिलांचे आरक्षण लागू होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सोडत काढण्यासाठी ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत तीन दिवसांची मुदत आयोगाने दिली असून, नेमकी सोडत कोणत्या दिवशी काढायची याचा निर्णय महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करून घेण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे निवडणूक विभाग उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.
या आरक्षण प्रक्रियेनंतर आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार असून, इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवक व पक्षपदाधिकाऱ्यांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे.

















