पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार असल्याचे जाहीर करत त्यांनी राजकीय रणशिंग फुंकले. तळवडे येथून प्रचाराचा नारळ फोडत अजित पवारांनी या आघाडीची औपचारिक घोषणा केली आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची एकजूट निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत दिले.
या वेळी अजित पवारांनी भाजपच्या सत्ताकाळावर जोरदार हल्लाबोल केला. “२०१७ पासून महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. कामांमध्ये उघडपणे रिंग होत आहे. ठराविक लोकांनाच कंत्राटे दिली जात आहेत. महापालिकेवर प्रचंड कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी भाजपच्या कारभाराची पोलखोल केली.
शहरातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधत अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये आज पाणीटंचाई गंभीर बनली आहे. पवना बंद जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. रेडझोनचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असून तोही सोडवला जाणार आहे. “विकासाच्या अनेक संधी शहरासमोर आहेत, मात्र सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे त्या वाया गेल्या,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
भाजपच्या सत्तेत असूनही राष्ट्रवादीने शहरासाठी अनेक कामे मार्गी लावल्याचा दावा करत अजित पवार म्हणाले, “तळवड्यातील ५९ एकर गायरान जमीन हस्तांतरित करून तिथे बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा केला. उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी ३२ गुंठे जागा महावितरणला दिली. सत्ता नसतानाही आम्ही कामे केली; आता सत्ता मिळाली तर शहराचा चेहरा बदलू.”
भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांवर बोलताना अजित पवार अधिकच आक्रमक झाले. “आज पिंपरी-चिंचवडमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. गुंडगिरी करून लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही फोडाफोडीचे राजकारण केले नाही. पण आज ‘याला फोड, त्याला फोड’ असे सुरू आहे. काही जण म्हणाले की, दम दिला म्हणून पक्ष सोडावा लागला. ही पद्धत लोकशाहीला काळीमा फासणारी आहे,” असे ते म्हणाले.
शेवटी, येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला—म्हणजेच ‘घड्याळा’ला मत देण्याचे आवाहन करत अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ही गुंडगिरी आणि भ्रष्टाचार पिंपरी-चिंचवडकरांनी आता खपवून घेऊ नये. शहराचा विकास, स्वच्छ कारभार आणि नागरिकांचे सुखकर जीवन हेच आमचे ध्येय आहे.”
या घोषणेमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नवी समीकरणे तयार झाली असून, आगामी महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची आणि आक्रमक होणार हे स्पष्ट झाले आहे.
