महात्मा फुले महाविद्यालयात व्यसनमुक्ती संदर्भात विशेष व्याख्यानाचे आयोजन
राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि नार्को कोऑर्डिनेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी-१७ येथे समाजप्रबोधन आणि विद्यार्थी विकासाच्या उद्देशाने व्यसनमुक्ती संदर्भात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम नार्को कोऑर्डिनेशन सेंटर, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन करून करण्यात आली, त्यानंतर लेफ्ट. प्रसाद बाठे(एन.सी.सी. अधिकारी) यांनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाच्या उद्देशावर प्रकाश टाकला.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. गणेश भागरे (कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना) यांनी करून दिला. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सामाजिक भान ठेवून सजग नागरिक होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक मा. डॉ. विष्णु शिवप्पा श्रीमंगले , कार्यकारी संचालक, मनोदय व्यसनमुक्ती संस्था, पुणे होते. त्यांनी आपल्या प्रभावी आणि समर्पक मार्गदर्शनामध्ये व्यसनाचे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक परिणाम यावर प्रकाश टाकला. त्यांनी व्यसनाच्या आहारी जाण्याची मानसिक प्रक्रिया, त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक उपाय योजना आणि समाजातील तरुणांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली.
प्राचार्य प्रा. (डॉ.) पांडुरंग भोसले यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांशी संवाद साधत, महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे कार्यक्रम सातत्याने राबवले जातील, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या आभारप्रदर्शन डॉ. प्रवीण बोरसे (कार्यक्रम अधिकारी, NSS) यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप्रिया प्रभू यांनी अत्यंत उत्तम रितीने पार पाडले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, एनएसएस व एनसीसी स्वयंसेवक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.













