चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

‘समाजाची सत्य स्वीकारण्याची मानसिकता नाही!’ – डॉ. संजय उपाध्ये

जिजाऊ व्याख्यानमाला - अंतिम पुष्प

Spread the love

 

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘समाजाची सत्य स्वीकारण्याची मानसिकता नाही!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी  चिंचवडगाव येथे  व्यक्त केले.

गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘सत्य, असत्य आणि समाजशांती’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना डॉ. संजय उपाध्ये बोलत होते. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, गांधीपेठ तालीम मित्रमंडळ अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, ‘सत्य, असत्य हे दोन शब्द महाभारतापासून चर्चेत आहेत; आणि आजतागायत ही परंपरा चालू आहे. वास्तविक सत्य, असत्य याचा पडताळा करणे ही व्यक्तिगत बाब आहे. पहलगाम याबाबत जो राजकीय गोंधळ घातला जात आहे, त्यावरून सत्य किंवा असत्य हे सोयीनुसार ठरवले जाते; परंतु त्यामुळे सामाजिक शांती ढवळली जाते. खरे म्हणजे या परिस्थितीत संपूर्ण भारत एक देश म्हणून प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

व्हॉट्सॲपसारख्या समाजमाध्यमातून स्वैराचारी प्रतिक्रिया प्रसूत केल्या जात आहेत. व्यवहारातही सत्य – असत्याचा विवेक न बाळगता माणसे व्यवहार करतात. असत्य काळोख तर सत्य उजेड असूनही दुर्दैवाने सत्याला पुराव्याची गरज भासते. असत्याला राजकीय मुत्सद्देगिरीचे कवच लाभते. अध्यात्मदेखील असत्याला रोखण्याचा प्रयत्न करीत नाही. असे असलेतरी समाजात सत्य रुजवावेच लागेल!’ भगवद्गीता, ज्ञानेश्वर, तुकोबा, कुसुमाग्रज यांचे संदर्भ तसेच विनोद, कविता उद्धृत करीत उपाध्ये यांनी सद्यःस्थितीवर मार्मिक भाष्य केले.

व्याख्यानापूर्वी, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. रोहिणी नाईक (जिजाऊ पुरस्कार), धनेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त कैलास साठे (चिंतामणी पुरस्कार) आणि सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ (क्रांतिवीर चापेकर पुरस्कार) यांना गौरविण्यात आले. पुरस्कारार्थींना सन्मानित केले जात असताना महिलापथकाने सामुदायिक शंखनाद करीत मानवंदना दिली. पुरस्कारार्थींच्या वतीने सुधीर गाडगीळ यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्स्फूर्त अन् खुसखुशीत उत्तरे देताना पंडित भीमसेन जोशी, दादा कोंडके, लता मंगेशकर, आशा भोसले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्मिक आठवणींना उजाळा दिला. महेश गावडे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षीय मनोगतातून अण्णा बनसोडे यांनी, ‘गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या संपूर्ण वाटचालीचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या तालिमेतून मल्ल तयार झाले; तसेच कार्यकर्तेही घडले!’ असे गौरवोद्गार काढले. दुर्गेश देशमुख, प्रदीप गांधलीकर आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button