ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र
		
	
	
‘त्या’ युवतीच्या प्रकरणानंतर भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा राजीनामा
 
						पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. भाजयुमोच्या महिला पदाधिकाऱ्याने मोरे यांच्यावर गंभीर आरोप करत चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाने चांगलेच वादाचे रूप घेतले होते. वाढत्या राजकीय दबावानंतर अखेर मोरे यांनी स्वतःहून पदत्याग करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सदर महिला पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीत अनुप मोरे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विनयभंगासह शिवीगाळ, मारहाण आणि जीविताला धोका अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे. २६ ऑक्टोबर रोजी चिंचवड परिसरात घडलेल्या घटनेत संबंधित युवतीला मोरे यांचे समर्थक असल्याचे सांगणाऱ्या काही पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी धमकावल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.
या घटनेनंतर स्थानिक राजकारणात खळबळ माजली होती. विरोधकांनी या प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीकेचे बाण सोडले होते. दरम्यान, पीडित युवतीने फेसबुक लाइव्हद्वारे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती. त्यानंतर काही तासांतच अनुप मोरे यांनी आपला राजीनामा सादर केला.
राजीनामा पत्रात अनुप मोरे यांनी म्हटले आहे:
“माझ्यावर गेल्या काही दिवसांपासून खोटे आरोप केले जात असून माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये, म्हणून मी भाजयुमो प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. माझे कुटुंब गेल्या ४० वर्षांपासून पक्षाशी निष्ठेने कार्यरत आहे आणि पुढेही पक्षासोबत राहील.”
दरम्यान, अनुप मोरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या पुढील नेतृत्वावर चर्चेला सुरुवात झाली आहे. या प्रकरणामुळे पक्षाच्या अंतर्गत वातावरणात तणाव वाढला असून, आगामी काळात भाजप युवा मोर्चाचे नवे नेतृत्व कोणाकडे दिले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

















