ताज्या घडामोडीपिंपरी
		
	
	
पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी प्रश्न सुटेपर्यंत ‘बांधकाम बंदी’ करा: आम आदमी पार्टीची महापालिकेकडे मागणी!
 
						पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील एक प्रगत शहर असूनही, पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना आजही ‘दिवसाआड पाणी’ या मूलभूत समस्येशी लढावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या प्रशासनाच्या अक्षमतेमुळे वाढली असून, सध्या शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा कमी दाबाचा आणि अनियमित होत असल्यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. या अत्यंत गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीचे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.
रविराज काळे यांनी स्पष्ट केले आहे की, एका बाजूला सध्याच्या नागरिकांना पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी मिळत नाहीये, तर दुसऱ्या बाजूला महानगरपालिका कोणतीही दूरदृष्टी न ठेवता असंख्य नवीन बांधकामांना भरमसाट परवाने देत आहे. हे धोरण पूर्णपणे जनता विरोधी असून, आहे त्या तुटपुंज्या पाणी व्यवस्थेवर अतिरिक्त आणि अनावश्यक भार टाकला जात आहे.
या पार्श्वभूमीवर, ‘आप’ने महानगरपालिका प्रशासनाकडे तातडीची मागणी केली आहे की, जोपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला दिवसातून दोनवेळेस पुरेसा आणि पूर्ण दाबाने पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत शहरात नवीन बांधकामांना कोणतीही परवानगी देण्यात येऊ नये आणि सध्या चालू असलेल्या बांधकामांना त्वरित ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात यावी. तसेच, भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी, पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र धरण उभारण्याच्या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचेही योग्य ती कार्यवाही न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा निवेदनात नमूद करण्यात आला आहे.निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका सह आयुक्त मनोज लोणकर यांचेकडे सादर केले त्यावेळी उपस्थित नवनाथ मस्के,शुभम यादव,विकी पासोटे, राहुल मदने, अॅड सुप्रिया गायकवाड,शिवकुमार बनसोडे,यल्लापा वालदोर,लक्ष्मण माने, अभिजित कदम उपस्थित होते.


















