अमोल थोरात यांचे वैफल्यग्रस्तेतून बेताल वक्तव्य , आरोपही बिनबुडाचे – शहर भाजपच्या सचिन काळभोरांचा घणाघाती आरोप
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अमोल थोरात वैफल्यग्रस्त होऊन शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या विरोधात वैयक्तिक पातळीवर टीकाटिपण्णी करून सोशल मीडियावर सवंग प्रसिद्धी मिळवत आहेत. शहरातील काही भाजपचे कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्याचे खापर शहराध्यक्ष शंकर जगताप व आमदार महेश लांडगे यांच्यावर फोडत आहेत. याच रागातून थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, थोरात यांचे वैफल्यग्रस्तेतून बेताल वक्तव्य असून, त्यांचे आरोपही बिनबुडाचे आहेत. थोरात यांना पक्षात कवडीची किंमत नसून केवळ माध्यमाकडून सवंग प्रसिद्धीसाठी थोरात हे स्टंटबाजी करत आहेत, असा घणाघाती आरोप पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रवी लांडगे व माजी पक्षनेते एकनाथ पवार यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे अमोल थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या विरोधात पक्ष सोडून गेल्यामुळे कारवाई करण्यात यावी, म्हणून मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमोल थोरात यांना पक्षात महत्वाचे पद देण्यात आले नाही. शहर कार्यकारिणीमध्येही स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर टिका-टिपण्णी सुरु आहे. सर्वच प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे काम सुरु असून, ज्या कार्यकर्त्यांची नगरसेवक होण्याची पात्रता नाही, त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप व आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप यांना बदनाम करु नये, अशीही अपेक्षा सचिन काळभोर यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.